
Washington News : हवाई यंत्रणेवर सायबर हल्ला नाही!
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या मध्यवर्ती हवाई वाहतूक प्रशासनाच्या (एफएए) यंत्रणेतील बिघाड तांत्रिक असून सायबर हल्ला झाल्याचा पुरावा नाही, असे स्पष्टीकरण ‘व्हाइट हाऊस’ने दिले आहे. यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे काल (ता. ११) अमेरिकेतील ९,५०० विमान उड्डाणांना विलंब झाला, तर १,३०० हून अधिक विमान उड्डाणे रद्द करावी लागली होती.
वैमानिकाला आणि विमानातील इतर कर्मचाऱ्यांना सूचना देण्याच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने अमेरिकेतील हवाई वाहतूक सेवा बुधवारी काही तास ठप्प झाली होती. हा सायबर हल्ला असल्याचा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.
मात्र, असा कोणताही हल्ला झाला नसल्याचा पुरावा नसून अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्याचे आदश दिले आहेत, असे ‘व्हाइट हाऊस’तर्फे पत्रकारांना सांगण्यात आले. ‘सर्व प्रवाशांची सुरक्षा हाच सर्वोच्च प्राधान्याचा मुद्दा असल्याने या बिघाडाचे कारण शोधून त्यावर उपाययोजना करणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे,’ असेही यावेळी सांगण्यात आले.
वाहतूक पूर्ववत
तांत्रिक बिघाडामुळे शेकडो उड्डाणे रद्द झाल्यानंतर हवाई वाहतूक हळूहळू पूर्ववत होत आहे. बिघाडानंतर मध्यवर्ती हवाई वाहतूक प्रशासनाने विमानांना विलंबाने उड्डाण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आता ही सूचना रद्द केली
असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, यानंतरही अनेक विमानांना उड्डाणासाठी विलंब होत आहे. उड्डाण करण्यापूर्वी वैमानिक सर्व यंत्रणा तपासत असून उड्डाण केलेली विमानेही सुरक्षितपणे विमानतळावर उतरू शकतात, असे ‘एफएए’ने स्पष्ट केले आहे.