कर्करोगावरील उपचारपद्धतीला नोबेल 

पीटीआय
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

स्टॉकहोम (पीटीआय) : कर्करोगावरील उपचारासाठी नवी क्रांतिकारी उपचारपद्धती विकसित करणारे अमेरिकेचे जेम्स ऍलिसन आणि जपानचे तासुकू होंजो यांना या वर्षीचे वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. रुग्णाची प्रतिकार शक्ती अत्यंत कमकुवत होते. प्रतिकार करणाऱ्या पेशी कमी होत जातात आणि रुग्ण मृत्यूच्या दाढेत जातो. कर्करोगाशी लढण्यासाठी पुरेशी प्रतिकारशक्ती रोग्याला मिळावी, यासाठी अनेक वर्षांपासून संशोधन करण्यात येत होते. ऍलिसन आणि होंजो यांनी नवी उपचार पद्धती शोधून काढली.

स्टॉकहोम (पीटीआय) : कर्करोगावरील उपचारासाठी नवी क्रांतिकारी उपचारपद्धती विकसित करणारे अमेरिकेचे जेम्स ऍलिसन आणि जपानचे तासुकू होंजो यांना या वर्षीचे वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. रुग्णाची प्रतिकार शक्ती अत्यंत कमकुवत होते. प्रतिकार करणाऱ्या पेशी कमी होत जातात आणि रुग्ण मृत्यूच्या दाढेत जातो. कर्करोगाशी लढण्यासाठी पुरेशी प्रतिकारशक्ती रोग्याला मिळावी, यासाठी अनेक वर्षांपासून संशोधन करण्यात येत होते. ऍलिसन आणि होंजो यांनी नवी उपचार पद्धती शोधून काढली. या नव्या पद्धतीमुळे रोग्याची कर्करोगाला प्रतिकार करण्याची शक्ती वाढेल आणि शरीरातील पेशी या कर्करोगापासून सुरक्षित राहू शकतील. या नव्या पद्धतीमुळे रुग्णांचे प्राण वाचवता येऊ शकतील. या कामगिरीबद्दल ऍलिसन आणि होंजो यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. 

नव्या उपचारपद्धतीमध्ये काही प्रथिने आणि कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य केले जाते. विशेषतः कर्करुग्णांमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या प्रथिनांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे शरीरात तयार होणारी नैसर्गिक प्रतिजैविके कर्करोगाच्या पेशींपर्यंत पोचू शकत नाहीत. प्रथिनांमुळे निर्माण होणारा हा अडथळा दूर करून शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली अधिक सक्षमपणे नव्या उपचार पद्धतीमुळे काम करू शकते, असे नोबेल समितीने म्हटले आहे. 

ऍलिसन हे टेक्‍सास विद्यापीठात प्राध्यापक आहेत, तर होंजो हे क्‍योटो विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आशियाचे नोबेल समजला जाणारा टॅंग पुरस्कार 2014मध्ये होंजो यांना मिळाला होता. स्टॉकहोमध्ये 10 डिसेंबरला होणाऱ्या कार्यक्रमात दोघांनाही नोबेलने सन्मानित करण्यात येईल. सन्मानचिन्ह व 90 लाख स्वीडीश क्रोनर असे पुरस्काराचे स्वरूप आहे. उद्या (ता.2 ) भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर करण्यात येणार आहे, तर बुधवारी (ता. 3) रसायनशास्त्रातील संशोधनासाठीचा पुरस्कार जाहीर करण्यात येईल. शांततेचे नोबेल शुक्रवारी (ता. 5), तर अर्थशास्त्रातील नोबेल पुढील सोमवारी (ता. 8 ) जाहीर करण्यात येणार आहे. या वर्षी पहिल्यांदाच साहित्याचे नोबेल देण्यात येणार नाहीये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nobel in the treatment of cancer