जनतेसमोर रडले हुकूमशहा किम जोंग उन; मागितली माफी

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 12 October 2020

उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन यांनी एका घटनेप्रकरणी जनतेची माफी मागितली आहे.

प्योंगयांग- उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन यांनी एका घटनेप्रकरणी जनतेची माफी मागितली आहे. यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचेही पाहायला मिळाले. कोरोना महामारीच्या काळात मी तुमच्या सोबत उभा राहू शकलो नाही, असं म्हणत त्यांनी जनतेची माफी मागितली. कामगार पक्षाच्या 75 व्या वर्धापणदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना किम जोंग उन भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. 

किम यांनी सभेत बोलताना मान्य केलं की, उत्तर कोरियन लोकांच्या विश्वास ते सार्थ करु शकले नाहीत आणि यासाठी त्यांनी जनतेची माफी मागितली. असं म्हणून त्यांनी आपला चश्मा काढला आणि त्यांनी आपले डोळे पुसले. आपल्या पूर्वजांच्या महान कामाची आठवण काढत ते म्हणाले की, मला हा देश चालवण्याची जबाबदारी देण्यात आली होती, पण माझे प्रयत्न आणि इमानदारी माझ्या लोकांच्या समस्या कमी करण्यासाठी पुरेसी ठरली नाही. 

भारतीय लष्कर घालतंय दहशतवाद्यांना कंठस्नान; 2020मध्ये 75 ऑपरेशन्स केली यशस्वी

अजस्त्र मिसाईल  Hwasong-15 ला आणले जगासमोर

किम जोंग उन यांनी यावेळी कोरोना महामारीवरही भाष्य केलं. जगभरातील देश कोरोना विषाणूमुळे हैराण आहेत. पण, उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचे ते म्हणाले आहेत. दक्षिण कोरियासोबतचे संबंध चांगले करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. किम यांनी कार्यक्रमात 22 चाकांच्या गाडीवर ठेवण्यात आलेले अजस्त्र आण्विक मिसाईल  Hwasong-15 जगासमोर आणले. तज्ज्ञांनी इशारा दिलाय की, ही मिसाईल अमेरिकेच्या कोणत्याही भागात हल्ला करु शकते. किम यांनी ही मिसाईल काही दिवसांपूर्वी आपल्या सैन्य परेडमध्येही दाखवली होती.  Hwasong-15 जगातील सर्वात जास्त लांबीच्या मिसाईल पैकी एक आहे.
 
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला आण्विक शस्त्र नष्ट करण्यास सांगितले आहे. पण, किम यांनी ट्रम्प यांच्या इशाऱ्याला केराची टोपली दाखवली आहे. आण्विक मिसाईलचे प्रदर्शन करुन त्यांनी हेच सिद्ध केले आहे. उत्तर कोरियाने मिसाईल जगासमोर आणल्यानंतर अमेरिकेने टीका केली आहे. किम यांचे मिसाईल प्रदर्शन निराशादायी असल्याचे अमेरिकेने म्हटलं आहे. शिवाय आण्विक शस्त्रांना नष्ट करण्याचे आवाहन केले आहे. 

(edited by- kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: north Korea chief kim jong un cry in front of people