साक्षात किम जोंग उन यांची दिलगिरी; दक्षिण कोरियाला म्हणाले 'माफ करा' 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 25 September 2020

सख्खे शेजारी असूनही कट्टर हाडवैरी असलेल्या दोन कोरियांच्या संघर्षात न भूतो अशी घटना घडली आहे.

सोल- सख्खे शेजारी असूनही कट्टर हाडवैरी असलेल्या दोन कोरियांच्या संघर्षात न भूतो अशी घटना घडली आहे. त्यात एका देशाच्या प्रमुखांनी चक्क माफी मागितली आहे. विशेष म्हणजे हे राष्ट्रप्रमुख साक्षात किम जोंग उन हे उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा आहेत. दक्षिण कोरियाच्या सरकारी अधिकाऱ्याच्या शवाची विटंबना झाल्याबद्दल त्यांनी दक्षिण कोरियाची माफी मागितली.

गुरुवारी दक्षिण कोरियाच्या एका अधिकाऱ्यावर उत्तर कोरियाच्या सैनिकांनी बेछूट गोळीबार केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पेटवून समुद्रात टाकण्यात आला. ही घटना अत्यंत क्रूर असल्याचे सांगून दक्षिण कोरियाने निषेध केला आहे. दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

गावाचे 'स्वस्तिक' नाव बदलणार नाही; विरोधानंतरही अमेरिकेतील गावकरी...

नेमके काय घडले

या व्यक्तीने उत्तर कोरियाच्या सागरी हद्दीत प्रवेश केला. त्यावेळी त्याला उत्तर कोरियाच्या सैनिकांनी ओळख विचारली. त्यावर कोणताही प्रतिसाद न देता पळून जाण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यामुळे दहा गोळ्या झाडण्यात आल्या, अशी माहिती उत्तर कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा संचालक सूह हून यांनी दिली. जवळपास एका दशकात उत्तर कोरियाकडून दक्षिण कोरियाचा नागरिक मारला जाण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे दक्षिण कोरियात संतापाचा उद्रेक झाला आहे.

कोरोनाचा संदर्भ

कोरियन सीमेवर मुळातच कडक बंदोबस्त असतो. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गस्त वाढविण्यात आली आहे. उत्तर कोरियाने आपल्या देशात संसर्ग पसरू नये म्हणून कडक उपाययोजना केली आहे. त्यानुसार सीमेवर परकीय व्यक्ती दिसताच गोळ्या घालण्याचा आदेश लष्कराला देण्यात आला आहे.

बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानावेळी विशेष...

अधिकृत प्रतिक्रिया अशी

उत्तर कोरियाने अधिकृत प्रतिक्रिया मनापासून व्यक्त केली आहे. त्यानुसार किम यांनी म्हटले आहे की, ही घटना अत्यंत अपमानास्पद असून श्री. मून (दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाई-इन) आणि दक्षिण कोरियन जनता यांच्याविषयी मी अत्यंत दिलगीर आहे.

अण्वस्त्र चर्चेचा संदर्भ

उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरून अमेरिका दबाव आणत आहे. उभय देशांतील संबंध त्यामुळे ठप्प झाले आहेत. त्यातच दक्षिण कोरियाशी चर्चा करण्याचे धोरण अमेरिकेने अवलंबिले आहे. त्यास उत्तर कोरियाने आक्षेप घेतला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: North Korea leader Kim Jong Un apologizes to south Korea