North Korea: किम जोंग ऊनच्या नाकावर टिच्चून अमेरिकेचा उत्तर कोरियाच्या दारात शस्त्र सराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किम जोंग

North Korea : किम जोंग ऊनच्या नाकावर टिच्चून अमेरिकेचा उत्तर कोरियाच्या दारात शस्त्र सराव

सोल - दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या सैन्यदलांनी गुरुवारी उत्तर कोरियाच्या सीमेजवळ मोठ्या शस्त्रास्त्रांचा सराव केला.

उत्तर कोरियाच्या सीमेवर आक्रमण करून होणारा सराव कदापी सहन करणार नाही, असा इशारा उत्तर कोरियाने दिला होता. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करून अमेरिका आणि दक्षिण कोरियाने आज संयुक्त सराव केला. या दोन्ही देशांमध्ये सैनिकी आघाडी स्थापन होऊन ७० वर्षे झाली आहे. जूनच्या मध्यापर्यंत पाच टप्प्यांत हा सराव होणार असून त्याचा पहिला टप्पा आज सुरू झाला आहे.

अमेरिका आणि दक्षिण कोरियातील क्षेपणास्त्र आणि अन्य शस्त्रांच्या या महत्त्वपूर्ण सरावावर उत्तर कोरियाकडून प्रतिक्रिया येत असते. आजच्या सरावावर त्यांच्याकडून तातडीने उत्तर आले नसले तरी गेल्या शुक्रवारी (ता.१९) सरकारी माध्यमांमध्ये यासंबंधी वृत्त प्रसिद्ध झाले होते.

हा सराव म्हणजे उत्तर कोरियाला लक्ष्य करून केला जाणारी युद्घ तालीमच आहे. देशाच्या सीमेनजीक होणाऱ्या या सरावाची गंभीर दखल घेतली जाईल, असे यात म्हटले होते. अमेरिका आणि दक्षिण कोरियाला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ‘उत्तर कोरिया सेंट्रल न्यूज एजन्सी’ने दिला आहे.

सरावाची वैशिष्ट्ये

या प्रकारच सर्वांत मोठी सराव समजला जातो

प्रथम १९७७ मध्ये दोन्ही देशांनी सरावाला सुरुवात केली

आतापर्यंत ११ वेळा सराव झाले आहेत

यंदाच्या सरावात अडीच हजार सैनिक आणि ६१० शस्त्र प्रणालींचा वापर

लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर, ड्रोन, रणगाडे आणि तोफखाना यांचा समावेश

याआधी २०१७मध्ये झालेल्या सरावात दोन हजार सैनिक आणि २५० शस्त्रे होती

टॅग्स :ArmyNorth Korea