आता दक्षिण चीन समुद्राच्या मुद्द्यावरून अमेरिका व चीन आमनेसामने

टीम ई-सकाळ
Thursday, 27 August 2020

चीन आणि भारत यांच्यातील संबंध सीमावादाच्या मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून चांगलेच बिघडले आहेत. त्यानंतर आता चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव देखील वाढत चालल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

चीन आणि भारत यांच्यातील संबंध सीमावादाच्या मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून चांगलेच बिघडले आहेत. त्यानंतर आता चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव देखील वाढत चालल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. जगभरातील कोरोना विषाणूचे संक्रमण, हॉंगकॉंग व तैवानच्या प्रकरणानंतर आता दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वाढत्या कुरापतींवरून अमेरिकेने चीनला घेरण्यास सुरवात केली आहे. नुकतेच दक्षिण चीन समुद्रात बांधकाम करत असलेल्या  चिनी कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. दक्षिण चीन समुद्रातील विवादित मुद्द्यावरून अमेरिकेने प्रथमच बीजिंगला लक्ष्य केले आहे.    

रशियाच्या व्हॅक्सिनसाठी भारताची तयारी? वाचा आरोग्य मंत्रालय काय म्हणते 

भारत आणि चीन यांच्यात मे महिन्याच्या सुरवातीपासून सीमावादाचा मुद्दा अधिकच उफाळला होता. व त्यानंतर हे दोन्ही देश आमने-सामने उभे राहिले होते. तर जगभरातील व अमेरिकेतील कोरोनाच्या प्रसारावरून अमेरिका, ऑस्ट्रेलिया व अन्य काही देशांनी चीनवर टीकेची झोड उठवली होती. यासोबतच चीनने हॉंगकॉंग संबंधित नवा सुरक्षा कायदा लागू केल्यामुळे देखील अनेक देशांनी चीनच्या विरोधात आवाज उठवला होता. याव्यतिरिक्त तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध कायमच धुमसत असतात. आणि आता यामध्ये दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वाढत्या हालचालींवरून अमेरिकेने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्या संबंधातील तणाव अधिक तीव्र झाला आहे. अमेरिकेने काल बुधवारी दक्षिण चीन समुद्रात चीनला बांधकामासाठी मदत करत असलेल्या 24 चिनी कंपन्यांवर कारवाई करत निर्बंध लादले आहेत. अमेरिकेने या सर्व कंपन्यांचा समावेश ब्लॅक लिस्टमध्ये केल्यामुळे आता या कंपन्यांना अमेरिकेत व तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करता येणार नाही. 

या कारवाईवर अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने सांगितले की, दोन डझनहून अधिक कंपन्यांनी दक्षिण चीन समुद्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध केलेल्या कृत्रिम बेटांवर बांधकाम आणि सैनिकीकरण करण्यासाठी चिनी सैन्यदलाला मदत करण्यास मोलाची भूमिका बजावली आहे. तर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर व्हिसा प्रतिबंध लादणार असल्याचे म्हटले आहे. यासोबतच चीनने दक्षिण चीन समुद्राचे पूर्ण सैनिकीकरण केला असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. 

अमेरिकेच्या या कारवाईनंतर चीनच्या परराष्ट्र प्रवक्त्यांनी ही कारवाई अवास्तव असल्याचे म्हणत निषेध नोंदवला आहे. तसेच हा भूभाग चीनचा अविभाज्य घटक असल्याचे सांगत, या ठिकाणी सुविधा निर्माण करणे व आवश्यक संरक्षण उपकरणे तैनात करणे ही देशांतर्गत गोष्ट असल्याचे सांगितले. व यासोबतच अमेरिकेने केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचे चीनकडून नमूद करण्यात आले आहे.     

भारतात कोरोना का वाढतोय? ICMR ने सांगितलं कारण

दरम्यान, दक्षिण चीन समुद्रावर चीन आपला हक्क असल्याचा दावा करत आहे. या प्रदेशाच्या मालकी हक्कावरून चीनचे फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई, व्हिएतनामसह एकूण तेरा देशांसोबत वाद सुरु आहेत. 

             


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the US and China are facing off over the South China Sea issue