इंडोनेशियातील मृतांची संख्या दोन हजारांवर 

इंडोनेशियातील मृतांची संख्या दोन हजारांवर 

पालू (पीटीआय): इंडोनेशियातील भूकंप आणि सुनामीग्रस्त पालू शहरात ठिकठिकाणी मदतकार्य सुरू असून आतापर्यंत दोन हजार मृतदेह सापडले आहेत. तसेच पाच हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. 

सुलावेसी बेटावरील दुहेरी आपत्तीमुळे मृतांची संख्या 1 हजार 944 झाली आहे. ढासळलेल्या इमारती आणि हॉटेलचे ढिगारे उपसण्याचे काम अद्याप सुरू असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. 28 सप्टेंबरला झालेल्या दुहेरी आपत्तीत पाच हजारांहून नागरिक बेपत्ता झाले असल्याची माहिती इंडोनेशिया लष्करी विभागाचे प्रवक्ते एम. थोहीर यांनी दिली. मदतीचा आजचा दहावा दिवस आहे. जर एखादा व्यक्ती जिवंत सापडला तर तो चमत्कारच असेल. 

तपास आणि बचाव पथकाचे संचालक बामबॅंग सुरयो यांनी हॉटेल रोआ-रोआ येथील तपास मोहीम थांबविली असल्याचे सांगितले. कारण, हॉटेलच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण असतील, याची शक्‍यता वाटत नाही. त्यामुळे बचाव पथकाचे काम सुरू ठेवून उपयोग नाही, असे त्यांनी नमूद केले. हॉटेलच्या ढिगाऱ्याखालून 27 जणांचे मृतदेह काढले आहेत. तसेच पाच पॅराग्लायडरचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी जाहीर केले. या विनाशकारी भूकंपात एकमेव परदेशी नागरिकाचा मृत्यू झाला असून, त्यात दक्षिण कोरियातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील ऍथलिटचा समावेश आहे. रोआ-रोआ हॉटेलच्या तब्बल 80 खोल्या 7.5 रेश्‍टर स्केलच्या हादऱ्याने ढासळल्या. त्यात 50 ते 60 जण अडकल्याचे सांगितले जात आहे. 

भूकंपग्रस्त सुलावेसी बेटाच्या मदतीसाठी जगभरातून ओघ सुरू आहे. रेड क्रॉसने सुमारे 1800 हून अधिक नागरिकांवर उपचार केले आहेत. सुमारे दोन लाखांहून अधिक नागरिकांना भूकंपाचा फटका बसला असून, अजूनही अन्नधान्याची आणि स्वच्छ पाण्याची टंचाई जाणवत आहे. दुर्गम भागातील भूकंपग्रस्त नागरिकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने खाद्यपदार्थ पुरवले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com