तीन नव्या रुग्णांमुळे ऑकलंड लॉक; न्यूझीलंडमधील सर्वांत मोठ्या शहरात पुन्हा निर्बंध

तीन नव्या रुग्णांमुळे ऑकलंड लॉक; न्यूझीलंडमधील सर्वांत मोठ्या शहरात पुन्हा निर्बंध
Updated on

ऑकलंड - कोरोनाचे तीन नवे स्थानिक रुग्ण आढळल्यामुळे ऑकलंड या न्यूझीलंडमधील सर्वांत मोठ्या शहरात रविवारी तीन दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. पंतप्रधान जेसिंडा अर्डेर्न यांनी हा निर्णय जाहीर केला.

एक जोडपे आणि त्यांची मुलगी असे एकाच कुटुंबातील तिघे कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यांना जास्त वेगाने पसरणाऱ्या विषाणूच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झाला आहे का आणि तो कसा झाला याची तपासणी आरोग्य अधिकारी करीत आहेत. संबंधित महिला एका विमान कंपनीच्या भोजनव्यवस्था विभागात काम करते. ती प्रामुख्याने लाँड्री सेवा विभागात काम करते. त्यामुळे संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

जानेवारीच्या २४ तारखेपासून स्थानिक रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याआधी सुमारे दोन महिने एकाही स्थानिक रुग्णाची नोंद झाली नव्हती. आता तिसऱ्या पातळीचे निर्बंध लागू करण्यात आले असून अत्यावश्यक खरेदी आणि अत्यावश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर पडता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. विवाह आणि अंत्यसंस्कार वगळता घराबाहेर एकत्र येण्यास बंदी आहे. या दोन कारणांसाठी सुद्धा कमाल दहा जणांनाच सहभागी होण्याची परवानगी असेल. मुलांना शाळेत जाण्यास मनाई असेल. गेल्या वर्षी जागतिक साथीचे जवळपास पूर्णपणे निर्मुलन करताना न्यूझीलंडने अत्यंत दक्षतेचे धोरण अवलंबिले होते. त्याचीच पुनरावृत्ती करण्यात आली आहे. हे धोरण योग्य असल्याचा पुनरुच्चार अर्डेर्न यांनी केला.

उर्वरित देशात दुसऱ्या पातळीचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जाहीर कार्यक्रमांतील सहभागी व्यक्तींची संख्या शंभरपर्यंत मर्यादित असेल. यात रेस्टॉरंट आणि कॅफेचाही समावेश आहे.

वीसपासून लसीकरण
दरम्यान, २० फेब्रुवारीपासून देशातील पन्नास लाख लोकांचे लसीकरण सुरु होईल. फायझर-बायोएन््टेक कंपनीची लस अपेक्षेपेक्षा लवकर मिळाली आहे.

आपण याआधी विषाणूचा खातमा केला आहे आणि आपण पुन्हा तो करूयात. रुग्णांना कसा संसर्ग झाला याची माहिती मिळविण्यासाठी आम्हाला तीन दिवसांचा कालावधी पुरेल. त्यानंतर आम्ही व्यापक चाचण्या हाती घेऊ तसेच सामूहिक संसर्गाचे प्रमाण जास्त आहे का हे सुद्धा  समजेल.
- जेसिंडा अर्डेर्न, न्यूझीलंडच्या पंतप्रधान

या रुग्णांना कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराची बाधा झाली आहे असे गृहीत धरून आम्ही त्यादृष्टीने कार्यवाही करीत आहोत.
- डॉ. अॅश्ले ब्लुमफिल्ड, आरोग्य महासंचालक

आणखी एक लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे लोकांच्या जीवनावर आणि उद्योगधंद्यांवर त्याचा होणारा परिणाम मी समजू शकतो. असे घडावे असे कुणालाच वाटत नव्हते, मात्र आरोग्य नियमावलीचे सर्वांनी पालन करावे.
- फिल गॉफ, ऑकलंडचे महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com