फक्त लशीमुळे कोरोना रोखणं शक्य नाही; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लस शोधण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. फायझर कंपनीनंतर आता मॉडर्नाची लससुद्धा कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचं समोर आलं आहे.

जिनिव्हा - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लस शोधण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. फायझर कंपनीनंतर आता मॉडर्नाची लससुद्धा कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी धक्कादायक असं वक्तव्य केलं आहे. फक्त लस कोरोनाचा संसर्ग रोखू शकत नाही असं WHO चे संचालक ट्रेडोस यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये कमी झालेला कोरोनाचा संसर्ग आता दुसऱ्या लाटेमुळे वाढत चालला आहे. काही देशांनी पुन्हा लॉकडाऊन केलं आहे. आतापर्यंत 54 दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जवळपास 1.3 दशलक्ष लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशावेळी जागतिक आरोग्य संघटनेनं जगाला इशाराच दिला आहे.

ट्रेडोस यांनी म्हटलं की, कोरोनाशी लढा देण्यासाठी इतर गोष्टींना पूरक म्हणून लस काम करेल. पण फक्त लस कोरोनाला नष्ट करू शकणार नाही. पुढच्या काळातही कोरोनाचे अस्तित्व राहणार आहे. त्यामुळे लोकांच्या टेस्ट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, क्वारंटाइन, सोशल डिस्टन्सिंग पाळणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचा - व्हॅक्सिनबाबत आनंदाची बातमी! आणखी एका कंपनीची लस 95 टक्के प्रभावी

लशीचा पुरवठा मर्यादित प्रमाणात असणार आहे. त्यामुळे सुरुवातीला लस देताना आरोग्य कर्मचारी, वृद्ध आणि धोका अधिक असलेल्यांना प्राध्यान्य देण्यात येईल. असे केल्यास मृतांची संख्या कमी होईल आणि आरोग्य यंत्रणाही कोरोनाशी लढण्यासाठी सक्षम होईल असं टेड्रोस यांनी म्हटलं.

शनिवारी जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एका दिवसात 6 लाख 60 हजार 905 नवीन रुग्णांची नोंद संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेकडे झाली. त्याआधी शुक्रवारी 6 लाख 45 हजार 410 इतक्या रुग्णांची नोंद झाली होती. ही आकडेवारी 7 नोव्हेंबरच्या आकडेवारीपेक्षा जास्त होती. 7 नोव्हेंबरला 6 लाख 14 हजार रुग्णांची नोंद झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only vaccine not enough to stop corona says who