व्हॅक्सिनबाबत आनंदाची बातमी! आणखी एका कंपनीची लस 95 टक्के प्रभावी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी जगातील काही देशांमध्ये पुन्हा उद्रेक होताना दिसत असून दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वॉशिंग्टन - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी जगातील काही देशांमध्ये पुन्हा उद्रेक होताना दिसत असून दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता कोरोनाच्या आणखी एका लशीबद्दल आनंदाची बातमी आली आहे. अमेरिकन औषध निर्मिती कंपनी असलेल्या मॉडर्नाने दावा केला आहे की, त्यांची कोरोनावरील लस 94 टक्के प्रभावी ठरली आहे. मॉडर्नाच्या या दाव्यामुळे आता जगाला लवकरच लस मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.

याआधी अमेरिकेची कंपनी असलेल्या फायझलने त्यांची व्हॅक्सिन 90 टक्क्यांहून जास्त प्रभावी असल्याचा दावा केला होता. मॉडर्ना, फायझरसह ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेनका या कंपन्यासुद्धा कोरोनाची लस तयार करण्यामध्ये आघाडीवर आहेत. भारतात सीरम, भारत बायोटेक यासह आणखी काही कंपन्या कोरोनाची लस तयार करत आहेत.

हे वाचा - कोरोनाचा धसका! संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द होण्याची शक्यता

मॉडर्नाने सोमवारी जाहीर केलं की, चाचणी घेण्यात येत असलेल्या कोरोनावरील लस विषाणूंना नष्ट करण्यामध्ये 94.5 टक्के यशस्वी ठरली आहे. मॉडर्नाने जवळपास 30 हजार जणांवर क्लिनिकल ट्रायल केल्यानंतर ही माहिती दिली आहे. मॉडर्नाचे सीईओ स्टीफेन बॅन्सेल यांनी सागितलं की, तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलमधील अभ्यासानंतर आम्हाला सकारात्मक असे निष्कर्ष मिळाले आहेत. ही लस अनेक गंभीर आजारांसह कोरोनाला रोखण्यामध्ये यशस्वी होऊ शकते.

हे वाचा - पत्नीसाठी करिअरला रामराम! कमला हॅरिस यांच्या मदतीसाठी पती सोडणार नोकरी

फायझर आणि बायोटेकनेसुद्धा कोरोनाची लस प्रभावी असल्याचा दावा केला होता. दोन्ही कंपन्यांनी म्हटलं होतं की, या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला व्हॅक्सिनच्या उत्पादनाला सुरुवात होईल. गेल्या आठवड्यात बायोटेक आणि फायझरने म्हटले होते की, व्हॅक्सिनच्या विश्लेषणानंतर अशी माहिती समोर आली की, ही लस 90 टक्क्यांहून अधिक लोकांना वाचवण्यामध्ये उपयुक्त ठरू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus america company moderna covid-19-vaccine 94 5 effective