डोनाल्ड ट्रम्प यांचा दुतोंडीपणा उघड 

वृत्तसंस्था
बुधवार, 9 जानेवारी 2019

- नरेंद्र मोदींशी चर्चा
- द्विपक्षी सहकार्य वाढविण्यावर सहमती 

नवी दिल्ली ः अफगाणिस्तानमधील ग्रंथालयाला निधी दिल्याप्रकरणी भारतावर तोंडसुख घेतल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे विविध द्विपक्षी मुद्द्यांवर चर्चा केली. विशेषतः अफगाणिस्तानमध्ये सहकार्य वाढविण्यावर ट्रम्प यांनी सहमती दर्शवल्याने त्यांचा दुतोंडीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

सोमवारी सायंकाळी झालेल्या या चर्चेत ट्रम्प यांनी मोदींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत टू प्लस टू चर्चा, द्विपक्षी भागिदारी तसेच भारत, अमेरिका आणि जपान यांच्यात जी-20 परिषदेदरम्यान झालेल्या त्रिपक्षी चर्चेबाबत समाधान व्यक्त केले. या वेळी भारतासोबतची व्यापारी तूट, संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढविणे, तसेच दहशतवाद या मुद्द्यांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली. या चर्चेत उभय देशांनी व्यापारी तूट कमी करण्यावर सहमती दर्शवल्याचे व्हाइट हाउसकडून सांगण्यात आले.

दरम्यान, एकीककडे भारतीय धोरणांवर टीका आणि दुसरीकडे द्विपक्षी सहकार्य वाढविण्याच्या गोष्टी करणाऱ्या ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका यातून समोर आली आहे. अफगाणिस्तानमधील ग्रंथालयास भारताने केलेल्या मदतीनंतर कुत्सितपणे त्याचा वापर कोण करणार, भारताने तेथे आपले सैन्य का धाडले नाही, असे प्रश्‍न ट्रम्प यांनी उपस्थित केले होते. शिवाय आयात शुल्काच्या आकारणीवरून त्यांनी यापूर्वी भारतावर अनेकदा तोंडसुख घेतले आहे.

अमेरिकेचा भारतासोबतचा व्यापार 
-एकूण व्यापार (अंदाजे) ः 126.2 
- निर्यात ः49.4 
- आयात ः 76.7 
- व्यापारी तूट ः 27.3 
(2017 मधील आकडेवारी अब्ज डॉलरमध्ये) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opening the duality of Donald Trump