ट्रम्प यांचे विरोधक तोंडघशी; गैरप्रकाराचा पुरावाच नाही

वृत्तसंस्था
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्यास अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधिगृहाने मंजुरी दिली आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाच्या सुनावणीवेळी अध्यक्षांनी गैरप्रकार केल्याचा एकही पुरावा विरोधकांनी सादर केलेला नाही, असा दावा 'व्हाइट हाउस' कडून आज करण्यात आला.

ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्यास अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधिगृहाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार संसदीय समितीसमोर सुनावणी सुरू आहे. या समितीसमोर अमेरिकेच्या युक्रेनमधील माजी राजदूत मारी योव्हानोवीच यांची साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी 'ट्रम्प यांचा कुठल्याही बेकायदा कृत्यात सहभाग होता, याची आपल्याला माहिती नाही', असे योव्हानोवीच यांनी सांगितले. त्याचाच आधार घेऊन व्हाइट हाउसकडून आज ट्रम्प यांच्या विरोधकांवर निशाणा साधण्यात आला.

ट्रम्प यांनी गैरप्रकार केल्याचा एकही पुरावा विरोधकांनी संसदीय समितीसमोर सादर केलेला नाही. वादग्रस्त दूरध्वनी संभाषणाचा आपण भाग नव्हतो, अशी साक्ष योव्हानोवीच यांनी दिली आहे. त्यामुळे विरोधक केवळ वेळेचा अपव्यय करीत आहेत, असे व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव स्टिफनी ग्रिशाम यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opposition does not have evidence against us president donald trump