ओसामा बिन लादेन हुतात्मा; इम्रान खान यांचं संसदेत खळबळजनक वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

ओसामा बिन लादेननं 2001 मध्ये अमेरिकेवर 9/11 ला दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात जवळपास 3 हजार अमेरिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. 

कराची - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत केलेल्या भाषणावेळी दहशतवादी ओसामा बिन लादेन हुतात्मा असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ओसामा बिन लादेन हा अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता. तसंच अमेरिकेत झालेल्या 9/11 च्या हल्ल्याचाही तो सुत्रधार होता. इम्रान खान यांनी भाषणात म्हटलं की, आम्हाला तेव्हा खूप लाज वाटली होती जेव्हा अमेरिकेनं एबटाबादमध्ये येऊन ओसामा बिन लादेनला मारलं. त्याला हुतात्मा केलं. 

इम्रान खान यांनी पहिल्यांदाच ओसामा बिन लादेनबाबत असं वक्तव्य केलं नाहीय. याआधी एका टीव्हीला मुलाखत देताना त्यांनी ओसामा बिन लादेनला दहशतवादी म्हणण्यास नकार दिला होता. एवढंच नाही तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे उदाहरण देताना म्हटलं होतं की ते ब्रिटनसाठी दहशतवादी होते तर दुसऱ्यांसाठी स्वातंत्र्यसैनिक होते. 

WHO ने कोरोनाबाबत दिला आणखी एक इशारा

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिका दौऱ्यावर असताना इम्रान खान म्हणाले होते की, पाकिस्तानने एबटाबादमध्ये ओसामा बिन लादेन असल्याबाबत अमेरिकन सुरक्षा एजन्सींना माहिती दिली होती. मात्र अमेरिकेनं पाकिस्तानला अदारात ठेवून लादेनला मारण्याचं ऑपरेशन करायला नको होतं. 

चीनची भारतातील गुंतवणूक टांगणीला

अमेरिकन न्यूज चॅनेलशी बोलताना इम्रान खान यांनी सांगितलं होतं की, अमेरिकन ऑपरेशनने पाकिस्तानची मान खाली गेली होती. कारण अमेरिकेला सहकार्य करूनही त्यांनी पाकिस्तानला विश्वास ठेवण्याच्या लायकीचं समजलं नाही. 

चीनच्या कुरापती सुरूच; आता या भागात वाढविले येथे सैन्य !

ओसामा बिन लादेननं 2001 मध्ये अमेरिकेवर 9/11 ला दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात जवळपास 3 हजार अमेरिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेच्या नेवी सील्सने 2011 मध्ये ऑपरेशन करून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता. अमेरिकन सैन्याने पाकिस्तानातील एबटाबाद इथं घुसून ही कारवाई केली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: osama bin laden a martyr says pak pm imran khan in parliament