ओझोनच्या थराला भगदाड

पीटीआय
Wednesday, 8 April 2020

आर्क्‍टिक खंडावरील ओझोनचे भगदाड आजपर्यंत मानवासाठी घातक नव्हते. परंतु पुढील काही आठवड्यांच त्याचा प्रवास जास्त लोकवस्तीच्या भागाकडे होईल. त्यामुळे सूर्याकडून येणाऱ्या अतीनील किरणांचा धोका जीवसृष्टीसाठी वाढणार आहे. 
- डॉ. मार्टिन डेमॅरीस, हवामानशास्त्रज्ञ

‘नासा’ची पाहणी, सजीवसृष्टीसमोर मोठे आव्हान
न्यूयॉर्क - आर्क्‍टिक खंडाच्यावर ओझोनला मोठे भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे. आजपर्यंत उत्तर ध्रुवावर पडलेल्या ओझोनच्या मोठ्या भगदाडापैंकी हे एक आहे. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या उपग्रहांनी मिळविलेल्या माहितीच्या आधारावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जर्मन एरोस्पेस सेंटरचे हवामानशास्त्रज्ञ डॉ. मार्टिन डेमॅरीस म्हणतात, ‘‘आर्क्‍टिक खंडावर आजवर पडलेल्या सर्वांत प्रभावशाली ओझोनचे भगदाड म्हणून याकडे बघावे लागेल.’’ 

सूर्यापासून प्रसारित झालेल्या अतिनील आणि इतर हानिकारक किरणांपासून पृथ्वीवरील जीवसृष्टीचा बचाव करण्याचे काम वातावरणातील ओझोनचा थर करतो. ओझोनच्या थराविना जीवसृष्टीची कल्पनाच आपण करू शकत नाही. पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावरील अंटार्क्‍टिकाच्या आकाशातील ओझोनचा थरही कमी जास्त होत असतो.

हिवाळ्यामध्ये उंचावरून वाहणारे ढग स्वतःबरोबर ‘क्‍लोरोफ्लुरोकार्बन’ला ही घेऊन येतात. त्यामुळे ओझोनची क्‍लोरोफ्लुरोकार्बन सोबत अभिक्रिया होते. त्यामुळे ओझोनच्या थराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. उत्तर ध्रुवाचे मात्र तसे नाही. दक्षिण ध्रुवाच्या तुलनेत हा ध्रुव थोडा उष्ण आहे. त्यामुळे तिथे अति उंचावरून वाहणारे ढग येतच नाही. पण यावर्षी थंड वाऱ्यांमुळे उत्तर ध्रुवावरील तापमानात जास्त घट झाल्यामुळे ‘क्‍लोरोफ्लुरोकार्बन’सोबत अभिक्रिया झाल्यामुळे तेथील ओझोनच्या थराला मोठे भगदाड पडले आहे. साधारणपणे ग्रीनलॅंडच्या आकारमानाच्या तिप्पट याचा आकार आहे. मार्चमध्ये निरीक्षणासाठी अवकाशात पाठविलेल्या फुग्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार ओझोनच्या थरात ९० टक्‍क्‍यांची घट झाली आहे. आता हे भगदाड माणसासाठीही मोठे आव्हान ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ozone layer hole