पाकने घेतलाय 'सर्जिकल स्ट्राइक'चा धसका

वृत्तसंस्था
शनिवार, 13 जुलै 2019

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने थेट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करीत बालाकोट येथील 'जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेची प्रशिक्षण केंद्रे उद्‌ध्वस्त केली होती.

इस्लामाबाद : सीमावर्ती भागातील हवाईतळांवरील लढाऊ विमाने भारत माघारी घेत नाही तोवर आम्ही व्यावसायिक स्तरावरील वाहतुकीसाठी आमची हवाई हद्द खुली करणार नाही, अशी दर्पोक्ती पाकिस्तानने केली आहे. पाकिस्तानचे हवाई वाहतूक सचिव शाहरुख नुसरत यांनी संसदीय समितीला ही माहिती दिली आहे. 

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने थेट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करीत बालाकोट येथील 'जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेची प्रशिक्षण केंद्रे उद्‌ध्वस्त केली होती. यानंतर संतापलेल्या पाकने 26 फेब्रुवारी रोजी पाकची हवाई हद्द भारतासाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. नुसरत हे नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाचे महासंचालक देखील आहेत. त्यांनी गुरुवारी सिनेटच्या हवाई वाहतूकविषयक स्थायी समितीसमोर त्यांची बाजू मांडली. 

भारताची विनंती 
नुसरत यांनी स्थायी समितीला सांगितले आहे की, ""भारत सीमावर्ती भागांमध्ये असणाऱ्या हवाईतळांवरील लढाऊ विमाने माघारी घेत नाही तोवर पाकची हवाई हद्द त्यांच्यासाठी खुली केली जाणार नाही.'' "डॉन'ने यासंदर्भातील सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. भारताने देखील आमच्याकडे हवाई हद्द खुली केली जावी म्हणून विनंती केली आहे. पण, आम्ही आमची चिंता त्यांच्या कानी घातली असून, भारत जोवर लढाऊ विमाने माघारी घेत नाही तोवर आम्ही देखील हवाई हद्द खुली करण्यास नकार दिला आहे, असे त्यांनी सांगितले. 

पर्यायी मार्ग महागडे 
पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्यानंतर भारताने पर्यायी मार्गाचा वापर सुरू केला आहे. पाकिस्तानची हवाई हद्द सध्या बंद असल्याने भारतीय विमान वाहतूक क्षेत्राला याचा मोठा फटका बसतो आहे. दूरच्या पर्यायी मार्गांचा भारताला अवलंब करावा लागत असल्याने विमान कंपन्यांना 430 कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनीच संसदेमध्ये ही माहिती दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan extends airspace ban until India withdraws fighter jets from border