Benazir Bhutto: ... जेव्हा एक महिला मुस्लिम जगतातील पहिल्या पंतप्रधान म्हणून शपथ घेते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Benazir Bhutto

Benazir Bhutto: ... जेव्हा एक महिला मुस्लिम जगतातील पहिल्या पंतप्रधान म्हणून शपथ घेते

Benazir Bhutto Biography: भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे देश भौगोलिकदृष्ट्या एकमेकांसाठी महत्त्वाचे तर आहेच, मात्र या देशातील राजकारण देखील काहीप्रमाणात समान असल्याचे पाहायला मिळते. जगात सर्वात प्रथम एखाद्या देशाचे नेतृत्व महिलेला करण्याची संधी मिळाली, हे देखील याच राष्ट्रांमध्ये झाले. श्रीलंकेच्या सिरिमाओ भंडारनायकेपासून ते भारताच्या इंदिरा गांधी, बांगलादेशच्या सध्याच्या पंतप्रधान शेख हसीना असो की पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो... या महिला नेत्यांनी स्वतःच्या राष्ट्राचे नेतृत्व तर केलेच, मात्र यातील काहींना वारसा हक्काने राजकारणात येण्याची संधी मिळाली हे देखील एक साम्यच. त्यातल्या त्यात मुस्लिम जगतातील पहिल्या महिल्या पंतप्रधान होणे ही सोपी गोष्ट नाही. ही किमया साधली बेनीझर भुट्टो यांनी.

तारीख २ डिसेंबरला १९८८ - आजपासून बरोबर ३४ वर्षांपूर्वी बेनीझर भुट्टो यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. यासोबतच त्या पाकिस्तानच्या आणि मुस्लिम जगतातील पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या होत्या. जवळपास ३ दशकांपूर्वी मुस्लिम राष्ट्राचे नेतृत्व एका महिलेने करणे अभूतपूर्व होते.

बेनीझर यांचे राजकारण संघर्षाने भरलेले होते. वडिलांकडून वारसाहक्काने सर्वकाही मिळाले असले तरीही या पदावर पोहचण्यासाठी त्यांना अथक प्रयत्न करावे लागले. देश सोडण्याचीही वेळ आली, मात्र त्यातही त्यांनी आपल्या विरोधकांवर मात करत दोनदा पंतप्रधानपदापर्यंत पोहचण्याची किमया साधली.

हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

वडिलही होते पंतप्रधान

भुट्टो हे पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. राजकारणातही या कुटुंबाचा दबदबा. बेनीझर यांचे वडील झुल्फीकार अली भुट्टो हे देखील एकेकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले होते. लोकशाही मार्गाने निवडून आलेले ते पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान. पाकिस्तानात सरकार आणि लष्करात नेहमीच संघर्ष पाहायला मिळतो. याच संघर्षात झुल्फीकार अली भुट्टो यांना पदावरून हटवून लष्कराची राजवट लागू करण्यात आली. बेनीझर या फक्त २५ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांना फाशी देण्यात आली होती. येथूनच बेनीझर यांचे राजकारण आणि संघर्ष दोन्हीही सुरू झाले.

वडिलांना फाशी देण्यात आल्यानंतर बेनीझर काही काळ तुरुंगात देखील होत्या. त्यानंतर त्या लंडनला निघून गेल्या. लंडनमध्येच त्यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेतृत्व आपल्या हाती घेत पक्ष बांधणीचे काम सुरू केले.

दोनदा पंतप्रधान होण्याची संधी

झिया उल हक यांच्याकाळात पाकिस्तानातील लोकशाही एकप्रकारे समाप्तच झाली होती. परंतु, झिया यांच्या निधनानंतर पाकिस्तानमधील जनतेला बेनझीर यांच्या रुपात आशा दिसू लागली होती. लंडनवरून परतल्यानंतर त्यांनी पक्ष बांधणीचे काम जोमाने केले होते. याचाच फायदा त्यांना निवडणुकीत झाला. २ डिसेंबर १९८८ ला बेनझीर यांनी पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

मात्र, त्या आपल्या पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण करू शकल्या नाहीत. पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या दीड वर्षातच त्यांना भ्रष्टाचाराचे आरोप करत पदावरून हटवण्यात आले. राष्ट्रपती गुलाम इश्क खान यांनी बेनझीर यांना पदावरून हटवत सत्ता नवाज शरीफ यांच्याकडे सोपवली. विशेष म्हणजे पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या तेव्हा बेनझीर या गरोदर होत्या.

पदावरून हटवण्यात आले असले तरीही पुढील काही महिन्यातच त्यांच्याकडे पंतप्रधान होण्याची दुसऱ्यांदा संधी आली. नवाज शरीफ यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर त्या दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या. मात्र, यावेळीही तत्कालीन राष्ट्रपती फारूक लेगारी यांनी भ्रष्टाचार व हत्येचा आरोप करत त्यांना पदावरून हटवले.

पतीवरील आरोप ठरले अडथळा

वडिलांना फाशी दिल्यानंतर असो की पंतप्रधानपदावरून हटवले असेल... बेनझीर यांना अनेकदा देश सोडून जावे लागेल.

वडिलांना फाशी झाल्यानंतर लंडनमध्ये त्यांनी अनेकवर्ष वास्तव्य केले. यावेळी त्यांनी आसिफ अली झरदारींशी लग्न केले. पुढील काळात झरदारी यांच्यावर झालेले आरोपच बेनझीर यांच्या उतरत्या राजकारणाला कारणीभूत ठरले. सत्तेत असताना बेनझीर आणि झरदारी यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले. स्विस कंपनीच्या या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यानंतर झरदारी यांना जेल झाली. तर बेनझीर यांना देश सोडावा लागला.

प्रचारादरम्यान हत्या

आरोपानंतर बेनझीर या जवळपास ८ वर्ष परदेशात होत्या. मात्र, मायदेशात परतल्यानंतर काही दिवसातच त्यांची हत्या झाली. तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी प्रचार करत असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांंनी अलकायदा व इतर दहशतवादी संघटनांवर जोरदार टीका केली होती. यामुळे त्या कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आल्या होत्या. रावळपिंडी येथे एका रॅली दरम्यान त्यांची गोळी झाडू हत्या करण्यात आली. यासोबतच, सुसाइड बॉम्बरने स्वतःला देखील उडवून दिले.

टॅग्स :Pakistan