पाकिस्तानमध्ये हिंदूंकडून उत्साहात दिवाळी साजरी, दिव्यांनी सजली मंदिरं

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी दिवाळीनिमित्त पाकिस्तानमधील हिंदू नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली- भारतात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. घरासमोर पणत्या, आकाशदिवे, फटाके उडवले जात आहेत. पण अगदी अशीच दिवाळी पाकिस्तानमध्येही साजरी केली जात आहे. पाकिस्तानमधील कराची शहरात हिंदू समाजाकडून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जारी केलेल्या नियमांचे पालन करत दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीचा सण हा प्रकाशाचा सण आहे. तो आतषबाजीने साजरा केला जातो. लहान मुलं, युवक, वृद्ध अशा सर्वच स्तरातील लोक दिवाळीच्या उत्सवात सहभागी झाल्याचे पाकिस्तानमधील एका हिंदू व्यक्तीने सांगितले. 

कराची येथील स्वामी नारायण मंदिरात हिंदू बांधवांकडून दिवे लावण्यात आले असून विद्युत रोषणाई आणि फुलांनी हे मंदिर सजवण्यात आले आहे. यावर ते पुढे म्हणाले की, 'आम्ही येथे केवळ सण साजरा करण्यासाठी आलेलो नाहीत. पेंटिंग्ज आणि कलेच्या माध्यमातून आनंदही घेत आहोत. त्यामुळे मला वाटते की, रक्ताने खेळण्याऐवजी रंगांबरोबर आपला सण साजरा करणे कधीही चांगलेच.' 

हेही वाचा- डोनाल्ड ट्रम्पच्या नातवांना शाळेतून काढून घेतले

गीता कुमारी यांनी म्हटले की, 'आम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आखून दिलेल्या नियमांचे पालन करत दिवाळी साजरी करत आहोत. या समारंभात आम्ही ईश्वराला कोरोना लवकरात लवकर संपू दे अशी प्रार्थना करत आहोत.' 

तत्पूर्वी, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी दिवाळीनिमित्त पाकिस्तानमधील हिंदू नागरिकांना शुभेच्छा दिल्या. 'आमच्या सर्व हिंदू नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा,' असे त्यांनी उर्दूत टि्वट केले होते. 

हेही वाचा- आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीने कर्नाटकात राजकीय चर्चांना उधाण

जगात हिंदू लोकसंख्या सर्वाधिक असलेल्या देशात पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आहे. इस्लामिक देशात सध्या 80 लाखांहून अधिक हिंदू आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Hindu community celebrated Diwali at Karachis Swami Narayan Temple