पाकिस्तानने भारतातील उच्चायुक्त परत बोलावला...

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 मार्च 2018

इस्लामाबादमध्ये बांधण्यात येत असलेल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने धाड घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा तणाव अधिक वाढला आहे. आयएसआयच्या या गेल्या महिन्यातील धाडीनंतर या इमारतीमधील वीज व पाण्याचा पुरवठाही तोडण्यात आला होता

इस्लामाबाद - भारतामधील पाकिस्तानचे उच्चायुक्त (हाय कमिशनर) सोहेल महमूद यांना पाकिस्तानी सरकारकडून अनिश्‍चित काळासाठी स्वदेशी परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानकडून दिल्लीमधील पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांना काम करणे "अवघड' होत असल्याचा कांगावा करण्यात आला होता.

इस्लामाबादमध्ये बांधण्यात येत असलेल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने धाड घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा तणाव अधिक वाढला आहे. आयएसआयच्या या गेल्या महिन्यातील धाडीनंतर या इमारतीमधील वीज व पाण्याचा पुरवठाही तोडण्यात आला होता. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्‍त अजय बिसरिया यांनी पाकिस्तानी परराष्ट्र सचिवाची भेट घेऊन या "गुंडगिरी'विरोधात कडक राजनैतिक निषेध नोंदविला होता. मात्र यानंतरही वीजपुरवठा दोन आठवड्यांपेक्षाही जास्त काळ तोडण्यात आला होता. बिसरिया यांनाही एका कार्यक्रमामध्ये भाग घेण्यापासून रोखण्यात आले होते.

भारत व पाकिस्तानमधील सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानचे हे पाऊल अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan india diplomacy