डॉ. मनमोहनसिंग यांना पाकिस्तान देणार निमंत्रण?; जाणून घ्या सविस्तर विषय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

कर्तारपूर कॉरिडॉरच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या उद्‌घाटन सोहळ्याचे निमंत्रण भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी आज दिली.

इस्लामाबाद : कर्तारपूर कॉरिडॉरच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या उद्‌घाटन सोहळ्याचे निमंत्रण भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी आज दिली.

भारतातील शीख भाविकांसाठी 9 नोव्हेंबर रोजी कर्तारपूर कॉरिडॉर खुला करण्याचे पाकिस्तानचे नियोजन आहे. कर्तारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून पाकिस्तानातील कर्तारपूर येथील दरबार साहीब आणि भारतातील पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक यांना परस्परांना जोडण्यात येणार आहे. या कॉरिडॉरच्या माध्यमातून भारतीय शीख भाविकांना कर्तारपूर साहीबला भेट देणे सुलभ होणार आहे.

भव्य कार्यक्रमाद्वारे कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्‌घाटन करण्याचा पाकिस्तानचा विचार आहे. या कार्यक्रमासाठी डॉ. मनमोहनसिंग यांना आमंत्रित करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यांना अधिकृत निमंत्रण पाठविण्यात येणार आहे, असे कुरेशी यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. डॉ. सिंग यांनी भारतातील शीख समुदायाचे प्रतिनिधित्व करावे. भारतीय शीख भाविकांचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असेही कुरेशी म्हणाले.

मनमोहनसिंग यांचा जन्म पाकिस्तानचा
दरम्यान, पाकिस्तानने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनाही कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी निमंत्रण दिले आहे. पण, अमरिंदरसिंग यांनी आपण पाकिस्तानला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असतानाही त्यांना पाकिस्तानने भेटीसाठी निमंत्रण दिले होते. पण, त्यांनी त्यावेळी पाकिस्तान भेटीस नकार दिला होता. विशेष म्हणजे, डॉ. मनमोहनसिंग यांचा जन्म पाकिस्तानातील आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चाकवाल जिल्ह्यातील गाह येथे डॉ. मनमोहनसिंग यांचा जन्म झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटूंब भारतात स्थलांतरीत झाले. तरी देखील डॉ. मनमोहन सिंग यांनी यापूर्वी पाकिस्तान भेटीचे आमंत्रण नाकारले होते. आता कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटन समारंभाला डॉ. मनमोहनसिंग जाणार का? याची उत्सुकता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan to invite manmohan singh to kartarpur corridor inauguration