कझाकीस्तानमध्ये आंदोलन पेटले | Protest | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Protest
कझाकीस्तानमध्ये आंदोलन पेटले

कझाकीस्तानमध्ये आंदोलन पेटले

नूर सुलतान : कझाकीस्तानमध्ये सरकारविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून काल (ता. ५) रात्री आंदोलकांनी सरकारी इमारतींवर हल्ला केला. यावेळी त्यांनी तेथे संरक्षणासाठी असलेल्या पोलिस आणि इतर सुरक्षा रक्षकांनाही मारहाण केली. यावेळी झालेल्या संघर्षात किमान बारा आंदोलक आणि बारा पोलिसांचा मृत्यू झाला. यापैकी एका पोलिसाचा शिरच्छेद केल्याचेही आढळून आले आहे. (Global News)

सोविएत रशियाच्या विघटनानंतर स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आलेल्या कझाकीस्तानमध्ये गेल्या तीस वर्षांत प्रथमच एवढे तीव्र आणि हिंसक आंदोलन सुरु झाले आहे. काल आंदोलकांनी आक्रमक रुप धारण केले होते. त्यांनी दुपारी देशातील सर्वांत मोठे शहर असलेल्या अलमाटीमध्ये महापौर इमारतीवर हल्ला करत ती ताब्यात घेतली आणि नंतर तिला आग लावून दिली.

हेही वाचा: मरवडे विषबाधा प्रकरण : दोन आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी

या घटनेमुळे आंदोलकांना चिथावणी मिळून त्यांनी रात्री अनेक सरकारी इमारतींवर हल्ला केला. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि गोळीबार करावा लागला. यावेळी आंदोलकांच्या हल्ल्यात ३५३ पोलिस जखमी झाले, तर १२ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनीही केलेल्या कारवाईत किमान बारा आंदोलक मारले गेले.

राजधानीपर्यंत झळ

आंदोलनाला देशाच्या पश्‍चिम भागात सुरुवात झाली. मात्र, लवकरच त्याचे लोण अलमाटी आणि राजधानी नूर सुलतानपर्यंत पोहोचले. हिंसा करणाऱ्या आंदोलकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देशाचे अध्यक्ष कासिम जोमार्त तोकायेव्ह यांनी दिले आहेत. अलमाटी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यांनी संपूर्ण देशात दोन आठवड्यांची आणीबाणीही लागू केली आहे. या हिंसाचारामागे विदेशी शक्तीचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा: १६ वर्षीय मुलाला दिली कोविशील्ड; वडिलांची प्रशासनाकडे तक्रार

असंतोषाचे कारण

कझाकीस्तानमध्ये इंधनाचे दर आकाशाला भिडल्याने जनतेमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे रविवारपासून (ता. २) नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु केले आहे. इंधन दरवाढ हे तत्कालीक कारण असून गेल्या तीस वर्षांपासून एकाच पक्षाच्या सरकारची देशावर सत्ता असून त्यांना लोक कंटाळले असल्याचे मूळ कारण असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. आकाराच्या बाबतीत जगातील नवव्या क्रमांकाचा मोठा देश असलेल्या कझाखस्तानला रशिया आणि चीन असे दोन बलिष्ट शेजारी आहेत. कझाखस्तानमध्ये तेलाचे मोठे साठे असल्याने येथील घडामोडींमध्ये या दोन्ही शेजारी देशांना बराच रस असतो. देशात प्रचंड खनिज संपत्ती असतानाही बहुसंख्य जनतेला गरीबीत रहावे लागत असल्यामुळे नाराजीचे वातावरण आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pakistanglobal news
loading image
go to top