पाकमधील प्रसारमाध्यमांची भारतातील निकालावर नजर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मे 2019

भारतातील लोकसभा निवडणुकांच्या निकालाबाबत पाकिस्तानातही उत्सुकता होती. निकाल जाहीर होण्यापूर्वी येणारे कौल तसेच त्यानंतर राजकीय आणि विविध स्तरांतून उमटणाऱ्या प्रतिक्रियांवर तेथील प्रसारमाध्यमे सकाळपासूनच लक्ष ठेवून होते. 

इस्लामाबाद : भारतातील लोकसभा निवडणुकांच्या निकालाबाबत पाकिस्तानातही उत्सुकता होती. निकाल जाहीर होण्यापूर्वी येणारे कौल तसेच त्यानंतर राजकीय आणि विविध स्तरांतून उमटणाऱ्या प्रतिक्रियांवर तेथील प्रसारमाध्यमे सकाळपासूनच लक्ष ठेवून होते. 

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उभय देशांमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. भारतातील नव्या सरकारच्या स्थापनेवर या संबंधांची दिशा अवलंबून असल्याने पाकिस्तानसाठी हे निकाल महत्त्वपूर्ण होते. मतमोजणीस सुरवात झाल्यानंतर भाजप आघाडीवर असल्याचे चित्र दिसू लागल्यावर तेथील आघाडीचे वृत्तपत्र "डॉन'मध्ये "भारतात मतमोजणीला सुरवात. मोदींच्या भाजपची प्रारंभीलाच आघाडी,' असा मथळा असलेली बातमी दिली. या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर भारतातील प्रमुख उमेदवारांच्या मतदारसंघांतील निकालाचे "अपडेट्‌स' तसेच जनतेने दिलेल्या प्रारंभीच्या कौलाबाबत नेत्यांच्या प्रतिक्रियांना स्थान देण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला होता. 

भाजपे निर्विवाद आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण होताच "द एक्‍स्प्रेस ट्रिब्यून'ने "भारतातील निवडणुकीत मोदींची एकतर्फी विजयाकडे वाटचाल!' अशा शीर्षकाची बातमी दिली. भारतातील अल्पसंख्याक मुस्लिमांना इशारा देण्यासाठी आपली हुकमत गाजवू इच्छिणाऱ्या तेथील हिंदुत्ववादी गटांना मोदींच्या पक्षाच्या विजयामुळे प्रोत्साहन मिळेल, असेही त्यात नमूद होते. 

"जिओ टीव्ही'ने मात्र केवळ निकालाचे प्रारंभीचे कौल देत या निवडणुकीचे वार्तांकन केले. तर, "रेडिओ पाकिस्तान'ने "भारतातील निवडणुकीत मोदींच्या पक्षाची घोडदौड' अशी बातमी दिली. 

भारतातील निवडणुकांनंतर मोदींच्या नेतृत्वाखालील पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास भारत-पाकिस्तानदरम्यानच्या शांतता चर्चेसाठी अधिक चांगली संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे काश्‍मीर प्रश्‍न सुटण्यास मदत मिळू शकते, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एप्रिल महिन्यात व्यक्त केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan media outlook on Indian media for Loksabha Results