बलात्काऱ्यांना केलं जाणार नपुंसक; पाकिस्तानने आणला कठोर कायदा

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 16 December 2020

पाकिस्तानमध्ये आता बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळणार आहे

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये आता बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळणार आहे. बलात्कार प्रकरणात दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला नंपुसक करण्याचा कायदा पाकिस्तान सरकारने मंजूर केला आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी या नव्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता बलात्कार प्रकरणांची सुनावणी लवकर होण्यासोबतच त्यांना कठोर शिक्षा होणार आहे. बीबीसीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात सहभागी असणाऱ्यांचे नॅशनल रजिस्टर तयार केले जाईल. तसेच या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायालयांची उभारणी केली जाणार आहे. विशेष न्यायालयं उभारण्यासाठी पंतप्रधानांकडून निधी सुरु करण्यात येईल. आता बलात्कार प्रकरणांचा निकाल चार महिन्याच्या आत लावला जाईल. यादरम्यान पीडितेची ओळख गुप्त ठेवण्यात येणार आहे. 

'जगातील 20 टक्के लोकसंख्येला 2022 पर्यंत कोरोना लस मिळण्याची शक्यता कमी...

नव्या कायद्यामध्ये अनेक प्रकारच्या महत्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. जर पोलिस किंवा सरकारी अधिकाऱ्यांकडून योग्य प्रकारे तपास झाला नाही, तर अशांना दंड किंवा तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो. तसेच पोलिस किंवा सरकारी अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देणाऱ्यांनाही शिक्षा दिली जाईल. वारंवार गुन्हा करणाऱ्यांना नंपुसक केले जाण्याची तरतूद कायद्यात आहे. 

लाहोरमधील एका घटनेने संतापाची लाट

लाहोरजवळ राष्ट्रीय महामार्गावर एका महिलेवर दोन मुलांसमोरच सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली. अनेक महिला रस्त्यावर उतरल्या. इम्रान खान यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. बलात्कार करणाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली पाहिजे किंवा नपुंसक करायला हवे. ज्या प्रकारे खूनाच्या घटनेत फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री अशा पद्धतीने शिक्षा असते. त्याच पद्धतीने बलात्कार करणाऱ्या आरोपींना शिक्षा असायला हवी. यामध्ये फर्स्ट डिग्री क्रमवारी गुन्ह्यातील आरोपींना रासायनिक पद्धतीने नपुंसक करायला हवे. अनेक देशात अशा पद्धतींचा वापर केला जात असल्याचे वाचले आहे. बलात्कारासारखा गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपींना सार्वजनिक ठिकाणी फाशी दिल्यास असा गुन्हा करणाऱ्यांच्या मनात एक भीती निर्माण होईल, असं इम्रान खान म्हणाले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan new law against women harassment imran khan