पाकिस्तानमध्ये मसूद अजहरवर कारवाईचे आदेश

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मे 2019

संयुक्त राष्ट्रने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर पाकिस्तानचीही कोंडी झाली. पाकिस्तानने यामुळे त्याची मालमत्ता जप्त करण्याबरोबरच प्रवासावर बंदी घातली आहे.

लाहोरः संयुक्त राष्ट्रने पाकिस्तानस्थित 'जैशे महंमद'चा म्होरक्‍या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर त्याला दुसरा मोठा फटका बसला आहे. पाकिस्ताननेही त्याला कोंडीत पकडले असून, त्याची संपत्ती जप्त करण्याबरोबरच प्रवासावर बंदी घातली आहे.

आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत मसूदचे नाव समाविष्ट झाल्याने त्याच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाणार आहेत. त्याला जगात फिरता येणार नसून, संयुक्त राष्ट्रच्या सदस्य देशांकडून मदत घेता येणार नाही. मालमत्ता जप्त होण्याबरोबरच त्याला कोणतेही शस्त्र वापरता येणार नाही. कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार मसूदला करता येणार नाहीत. विशेष म्हणजे या बंदीचा सर्वाधिक परिणाम पाकिस्तानवर होणार आहे. आजपर्यंत मसूद मोकाटपणे पाकिस्तानात फिरत होता आणि भारताविरुद्ध भाषणे देत होता. मात्र आता या सर्व कारवायांना पाकिस्तानला लगाम घालावा लागणार आहे.

संयुक्त राष्ट्रने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर पाकिस्तानचीही कोंडी झाली. पाकिस्तानने यामुळे त्याची मालमत्ता जप्त करण्याबरोबरच प्रवासावर बंदी घातली आहे. मसूद विरोधात निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश पाकिस्तान सरकारने अधिकाऱ्यांना दिले आहेत. अमेरिका, यूके आणि फ्रान्सने मांडलेल्या प्रस्तावाला चीननेही पाठिंबा दिल्यानंतर अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला. पुलवामा हल्ल्यानंतर काही दिवसातच फ्रान्स, यूके आणि अमेरिकेने अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अलकायदा निर्बंध समितीमध्ये प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील 15 देशांमध्ये विटो अधिकार असलेला चीनने आपला विशेषधिकार वापरुन अझर विरोधातील प्रस्तावर रोखला होता. पण अखेर आंतरराष्ट्रीय दबावापुढे नमते घेत चीनला माघार घ्यावी लागली आहे.

बंदीचा परिणाम

  • अजहरवर बंदी घातल्याने संयुक्त राष्ट्रच्या सदस्य देशांत त्याला प्रवेश करता येणार नाही.
  • संयुक्त राष्ट्रच्या सदस्य देशांना त्याचा निधी गोठवावा लागेल. आर्थिक मालमत्ता, आर्थिक स्रोत यावर संपूर्णपणे बंदी घातली जाईल.
  • सध्याच्या देशात असलेली त्याची मालमत्तादेखील जप्त करावी लागणार आहे आणि संबंधित व्यक्ती किंवा तिच्या संस्थांचे आर्थिक स्रोतही थांबविले जाणार.
  • संयुक्त राष्ट्रशी निगडित देशाला दहशतवादी अजहरला कोणत्याही प्रकारची मदत देता येणार नाही.
  • संयुक्त राष्ट्रच्या सदस्य देशांना आपले शस्त्र, त्याच्या निर्मितीचे तंत्र, स्पेअर पार्टसह शस्त्राशी निगडित कोणतीही वस्तू ही त्याच्यापर्यंत पोचणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan order to freeze terrorist masood azhar assets