पुरावे देण्याचे पाकचे तुणतुणे; इम्रान यांचे कारवाईचे आश्‍वासन 

वृत्तसंस्था
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

पाकचा दावा खोटा 
"पुलवामा येथे सुरक्षा दलांवर झालेला हल्ला ही दहशतवादी घटना असल्याचे मान्य करण्याचे पाकिस्तानी पंतप्रधानांनी नाकारणे ही भारतासाठी आश्‍चर्याची बाब नाही. पाकिस्तान हा दहशतवादाचा सर्वाधिक बळी ठरलेला देश असल्याचा त्यांचा दावा वस्तुस्थितीशी विसंगत असून, पाकिस्तान हेच दहशतवादाचे उगमकेंद्र असल्याचे आंतरराष्ट्रीय जगतात मान्य झालेले वास्तव आहे,'' अशा शब्दांत भारताने पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. 

इस्लामाबाद : पुलवामा हल्ल्यानंतर सर्व बाजूंनी टीकेचे धनी झालेला पाकिस्तान "बॅकफूट'वर गेला असला तरी जबाबदारी झटकण्याची त्यांची सवय कायम असल्याचे आज सिद्ध झाले. भारताने कृती करण्याइतपत सबळ पुरावे दिल्यास हल्ल्यास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करू, असे तुणतुणे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज लावले. मुंबईवरील हल्ल्यानंतरही पाकिस्तानने हाच कांगावा केला होता. 

पुलवामामधील हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याच्या भारताच्या आरोपांवर इम्रान खान यांनी आज एक व्हिडिओद्वारे उत्तर दिले. भारतात सध्या निवडणुकीचा काळ असल्याने पाकिस्तानवर आरोप ठेवून मते मिळविणे सोपे आहे. मात्र विवेकबुद्धी जागी ठेवून भारत चर्चेचा मार्ग अनुसरेल, अशी आशा इम्रान यांनी करत भारतालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. "काश्‍मीरमधील घटनांना कायम पाकिस्तानला जबाबदार धरले जाते. अफगाणिस्तानमधील वादाप्रमाणे काश्‍मीरचा वादही चर्चेतूनच सोडविला जाऊ शकतो. त्यामुळे या हल्ल्यात पाकिस्तानी नागरिक सहभागी असल्याचा कोणताही सबळ पुरावा भारताकडे असल्यास तो त्यांनी द्यावा, आम्ही निश्‍चितपणे कारवाई करू,' असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

भारतामध्ये पाकिस्तानचा सूड घेण्याची भाषा होत आहे. मात्र आमच्यावर हल्ला झाल्यास आम्हीही प्रत्युत्तर देऊ, असे अवसानही इम्रान खान यांनी आणले आहे. दहशतवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानने "आपल्याला स्थैर्य हवे आहे,' असाही आव आणला आहे. पाकिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी करणारा आमचाही शत्रू असल्याचे सांगत इम्रान यांनी, हा "नवा पाकिस्तान' असून दहशतवादावर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असे इम्रान यांनी सांगितले. 

राष्ट्रसंघाच्या हस्तक्षेपाची मागणी 
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याने तो कमी करण्यासाठी आणि चर्चेचा मार्ग खुला करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी आपापल्या राजदूतांना "चर्चेसाठी' माघारी बोलाविले असून, भारताने पाकिस्तानची सर्व बाजूंनी नाकेबंदी करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरर्स यांना पत्र लिहित मदतीची याचना केली आहे. या पत्रात कुरेशी यांनी भारताविरोधात बरीच गरळ ओकली आहे. 

पाकचा दावा खोटा 
"पुलवामा येथे सुरक्षा दलांवर झालेला हल्ला ही दहशतवादी घटना असल्याचे मान्य करण्याचे पाकिस्तानी पंतप्रधानांनी नाकारणे ही भारतासाठी आश्‍चर्याची बाब नाही. पाकिस्तान हा दहशतवादाचा सर्वाधिक बळी ठरलेला देश असल्याचा त्यांचा दावा वस्तुस्थितीशी विसंगत असून, पाकिस्तान हेच दहशतवादाचे उगमकेंद्र असल्याचे आंतरराष्ट्रीय जगतात मान्य झालेले वास्तव आहे,'' अशा शब्दांत भारताने पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan pm imran khan on pulwama terror attack