
पाच लग्न, तीनवेळा मुख्यमंत्री, कोण आहेत पाकिस्तान PM पदाचे दावेदार शाहबाज शरीफ?
पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) चे अध्यक्ष शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचं नाव पाकिस्तानच्या पंतप्रधान (Pakistan PM) पदासाठी निश्चित झालं आहे. ते माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ असून त्यांनी पाकिस्तानातील राजकारणात महत्वाचं असलेल्या पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. नवाज शरीफ नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊया.
सप्टेंबर 1951 मध्ये लाहोरमध्ये पंजाबी भाषिक काश्मिरी कुटुंबात जन्मलेल्या शाहबाज शरीफ यांनी 1980 च्या दशकाच्या मध्यात त्यांचा मोठा भाऊ नवाज यांच्यासह राजकारणात प्रवेश केला. 1988 मध्ये जेव्हा नवाज पंजाबचे मुख्यमंत्री झाले तेव्हा शाहबाज पहिल्यांदा पंजाब विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.
नवाज शरीफ पंतप्रधान असताना १९९७ मध्ये शाहबाज पहिल्यांचे पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री झाले. 1999 मध्ये जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांची सत्तापालट केली. यानंतर शाहबाज आपल्या कुटुंबासह सौदी अरेबियात आठ वर्षे राहिले. त्यानंतर गेल्या २००७ मध्ये ते पाकिस्तानमध्ये परतले.
शाहबाज 2008 मध्ये दुसऱ्यांदा आणि 2013 मध्ये तिसऱ्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री झाले. जनरल मुशर्रफ यांनी त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती आणि त्यांनी त्यांचा मोठा भाऊ नवाज यांना सोडण्याची अट ठेवली होती. परंतु त्यांनी स्पष्टपणे नकार दिला, असा दाव शाहबाज यांनी केला आहे.
2017 मध्ये पनामा पेपर्स प्रकरणात पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पदावरून हटवल्यानंतर पीएमएल-एनने शाहबाज यांची पक्षाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर 2018 च्या निवडणुकीनंतर ते नॅशनल असेंब्लीचे विरोधी पक्षनेते बनले. सप्टेंबर 2020 मध्ये, शाहबाज यांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक केली होती.
शाहबाज यांनी भ्रष्टाचाराचे आरोप नाकारले. त्यांना अनेक महिने तुरुंगात राहावे लागले. त्यानंतर त्यांना जामीन देखील मिळाला. पण, आताही ते १४ अब्ज पाकिस्तानी रुपयांच्या मनी लाँडरींग प्रकरणाचा सामना करत आहेत.
नवाज यांची मुलगा आणि पीएमएल-एनच्या उपाध्यक्षा मरियम नवाज यांनी म्हटलं की, शाहबाज यांनी निःस्वार्थपणे आणि अथकपणे देशाची सेवा केली आहे. नवाझ शरीफ यांना त्यांची मुलगी मरियम यांनी पंतप्रधान व्हावे, असे वाट होते. पण, त्यांना एव्हनफिल्ड भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे नवाज यांच्याकडे त्यांच्या पक्षाकडून सर्वोच्च कार्यकारी पदासाठी शाहबाज यांना उमेदवारी देण्याशिवाय पर्याय नव्हता.
2017 मध्ये जेव्हा पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने पदावरून हटवले तेव्हा त्यांनी शाहबाज यांच्याऐवजी पक्षाचे नेते शाहिद खाकान अब्बासी यांना 10 महिन्यांच्या पंतप्रधानपदासाठी प्राधान्य दिले. पाकिस्तानच्या 75 वर्षांच्या इतिहासातील अर्ध्याहून अधिक काळ लष्कराने देशावर राज्य केले आहे. सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत लष्कराचा आजही मोठा प्रभाव आहे.
शाहबाज यांचे वडील मुहम्मद शरीफ हे उद्योगपती होते जे काश्मीरमधील अनंतनाग येथून व्यवसायासाठी आले होते. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील जट्टी उमरा गावात स्थायिक झाले होते. त्यांच्या आईचे कुटुंब पुलवामा येथील होते. फाळणीनंतर, शाहबाज यांचे कुटुंब अमृतसरहून लाहोरला गेले. लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेज युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पदवी प्राप्त केली.
शाहबाज यांनी पाच लग्ने केली. त्यांना नुसरत आणि तेहमीना दुर्रानी अशा दोन बायका आहेत, तर आलिया हानी, निलोफर खोजा आणि कुलसूम या तिघींना घटस्फोट दिला. त्यांना नुसरतपासून दोन मुले आणि तीन मुली, तर आलियापासून एक मुलगी आहे.
शाहबाज यांचा मोठा मुलगा हमजा शाहबाज पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेता आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ युतीचे उमेदवार परवेझ इलाही यांच्याविरुद्धही हमजा मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक लढवत आहे. त्यांचा धाकटा मुलगा सुलेमान शाहबाज कुटुंबाचा व्यवसाय पाहतो. मनी लाँड्रिंग आणि बेहिशोबी उत्पन्न प्रकरणात तो फरार असून गेल्या काही वर्षांपासून तो यूकेमध्ये आहे.
Web Title: Pakistan Political Crisis Know All About Who Is Pakitan Pm Shehbaz Sharif
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..