इम्रान खान तर लष्कराचे बाहुले

पीटीआय
Wednesday, 14 October 2020

पाकचा आंतरराष्ट्रीय दर्जा कमकुवत होण्याचा दोष इम्रान यांनी नुकताच जाहीरपणे मला दिला. प्रत्यक्षात दहशतवादाला खतपाणी आणि स्वातंत्र्याच्या गळचेपीमुळे हे घडले आहे. 

वॉशिंग्टन - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे लष्कराच्या हातातील बाहुले असून शक्तिमान लष्करामुळेच शेजाऱ्यांशी शत्रुत्व निर्माण झाले आहे, असा घरचा आहेर पाकिस्तानच्या आजी-माजी खासदारांनी केला आहे.

साथ (साऊथ एशियन अगेन्स्ट टेररीझम अँड फॉर ह्युमन राईट््स-दहशतवादाविरुद्ध आणि मानवी हक्कांसाठी दक्षिण आशियाई) या संघटनेच्या पाचव्या वार्षिक परिषदेत असे परखड मत व्यक्त करण्यात आले. शेजारी देशांबरोबरील संबंधांमध्ये तणाव, असुरक्षितता आणि सौहार्दाबाबत अकार्यक्षमता यास ताकदवान लष्करास जबाबदार धरण्यात आले.

पश्तून नेते तसेच माजी खासदार अफ्रासियाब खट्टक यांनी पाकिस्तानमधून भाग घेतला. त्यांच्यासह बहुतेक सहभागी नेते तसेच कार्यकर्त्यांनी इम्रान यांना दोष दिला. खट्टक म्हणाले की, सध्याची लष्करी राजवट राजकीय संस्थांचा कायदेशीर दर्जा रद्दबातल ठरवीत आहेत. हा प्रकार इतका टोकाला गेला आहे सदस्य संसदेच्या अधिवेशनाला केव्हा उपस्थित राहायचे आणि मतदानाला केव्हा गैरहजर राहायचे याचा आदेश गुप्तचर संस्था देत आहेत.

सहसंस्थापक हुस्नैन हक्कानी यांनी सांगितले की, पाकचा आंतरराष्ट्रीय दर्जा कमकुवत होण्याचा दोष इम्रान यांनी नुकताच जाहीरपणे मला दिला. प्रत्यक्षात दहशतवादाला खतपाणी आणि स्वातंत्र्याच्या गळचेपीमुळे हे घडले आहे. मानवी हक्कांच्या लढ्यासाठी सक्रीय होण्यामुळे हे घडलेले नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक सिंधी परिषदेच्या रुबीना ग्रीनवूड, गिलगीट-बाल्टीस्तानमधून ताहिरा जबीन, सेरैकी मुव्हमेंटचे शहझाद इरफान, पश्तून कौन्सिल ऑफ अमेरिकाचे रसूल मोहम्मद अशा वक्त्यांनी विविध अल्पसंख्यांकांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविला.

साथच्या याआधीच्या वार्षिक परिषदा लंडन, वॉशिंग्टनमध्ये झाल्या आहेत. यंदा कोरोनामुळे व्हर्चुअल स्वरूप अटळ ठरले, पण त्यामुळे अनेक प्रमुख बंडखोर सदस्य मायदेशात म्हणजे पाकिस्तानमध्ये असूनही त्यात भाग घेऊ शकले आणि मते मांडू शकले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाकला बहुराष्ट्रीय देश म्हणून मान्यता दिली तरच सिंधी आणि बलुच लोकांना विश्वास जिंकता येईल. सिंधला ऐतिहासिक वारसा आहे. सिंधी घटकांमध्ये फूट पाडता येणार नाही, तसेच त्यांची ओळखही नाकारता येणार नाही.
- रुबीना ग्रीनवूड

पाकिस्तानात अघोषित मार्शल लॉ लागू आहे. हा सर्वाधिक धोकादायक मार्शल लॉ आहे, याचे कारण यामुळे घटनात्मक संस्थांना बीभत्स आणि अतिरंजीत स्वरूप मिळाले आहे.
- अफ्रासियाब खट्टक

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Prime Minister Imran Khan