मसूद अजहरची सुटका; भारतावर मोठ्या हल्ल्याची तयारी?

वृत्तसंस्था
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) नुकतेच मसूद अजहरसह दहशतवादी संघटना जमात उद दावाचा म्होरक्‍या आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद व माफिया डॉन दाऊद इब्राहीम यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेले आहे. 

इस्लामाबाद : काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला असून, आता पाकिस्तानने जैशे महंमदचा प्रमुख मसूद अजहर याची सुटका केल्याने भारतावर मोठ्या हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड अशी ओळख असलेल्या मसूद अझहरची सुटका पाकिस्तानने केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी मसूद अजहरला अटक करण्याचे नाटक पाकिस्तानकडून करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा पाकिस्तानने त्याची सुटका करत ते नाटक असल्याचे दाखवून दिले आहे. भारताने मसदूच्या अटकेवेळीच म्हटले होते, की पाकिस्तान नाटक करत आहे. अखेर ते खरे ठरले आहे.

एका वृत्तानुसार, जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तान एकाकी पडले आहे. कोणत्याही देशाकडून त्यांना पाठिंबा मिळालेला नाही. त्यामुळे चिडलेल्या पाकिस्तानने आता आपले दहशतवादी चेहरा पुन्हा समोर आणल्याचे दिसत आहे. जैशे महंमदचा म्होरक्या अशी ओळख असलेला मसूद अजहर हा संसदेवरील हल्ला, मुंबईवरील हल्ला, पुलवामा, उरी येथील हल्ल्यांचा मास्टरमाइंड आहे. मसूदच्या सुटकेनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. 

संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) नुकतेच मसूद अजहरसह दहशतवादी संघटना जमात उद दावाचा म्होरक्‍या आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद व माफिया डॉन दाऊद इब्राहीम यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan releases Jaish-e-mohammed chief Masood Azhar from custody amid tensions with India