पाकिस्तानकडूनही टिकटॉकवर बंदी; देशाच्या सुरक्षेचं नाही तर सांगितलं वेगळंच कारण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

भारत आणि अमेरिकेनंतर आता चीनचा जवळचा मित्र पाकिस्ताननेसुद्धा टिकटॉकवर बंदी घातली आहे.

इस्लामाबाद - भारत आणि अमेरिकेनंतर आता चीनचा जवळचा मित्र पाकिस्ताननेसुद्धा टिकटॉकवर बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीने बंदी घालताना म्हटलं की समाजातील अनेक स्तरातून टिकटॉकबाबत तक्रार येत होती. यामध्ये टिकटॉक व्हीडिओ अॅपच्या माध्यमातून अश्लीलता पसरवण्यात येत असल्याची तक्रार मोठ्या प्रमाणावर येत होती.

पाकिस्तानच्या टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीने म्हटलं की, अॅपवर अनैतिक आणि असभ्य अशा प्रकारचे व्हीडिओ शेअर होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. टिकटॉकला अंतिम नोटीस पाठवून त्याला उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. या वेळेत त्यांना ऑनलाइन साहित्याच्या मॉडरेशनसाठी काही प्रणाली तयार करता आली असती. मात्र अशा कोणत्याच हालचाली टिकटॉककडून दिसल्या नाहीत. त्यामुळे पाकिस्तानने टिकटॉकवर बंदीची कारवाई केली. 

याआधी 18 सप्टेंबरला अमेरिकेनं राष्ट्रीय सुरक्षेचं कारण सांगत लोकप्रिय अशा चिनी अॅप टिकटॉक आणि वीचॅटवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. तेव्हा अमेरिकेनं म्हटलं होतं की, ही दोन्ही अॅप देशाच्या एकता आणि सुरक्षिततेसाठी धोकादायक आहेत. 

भारताने 29 जुलैरोजी चीनच्या एकूण 59 अॅपवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉक, व्हीगो व्हीडिओ, हॅलो, यूसी ब्राउझर, यूसी न्यूज, वीचॅट, शेअर चॅट या अॅपचा समावेश होता. भारत सरकारने देशाच्या एकतेला आणि डेटा सुरक्षेला धोका असल्याचं कारण यावेळी सांगितलं होतं. मात्र सरकारने हा निर्णय 15 जूनला लडाखच्या गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घेतला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Telecommunication Authority blocks Chinese app TikTok