पाकिस्तानचे उच्चायुक्त भारतात परतले; तणाव कायमच

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

नवाझ शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर पाकमध्ये आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच भारत-पाक राजनैतिक संघर्ष उद्‌भविला असण्याची शक्‍यता आहे

 नवी दिल्ली - पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त सोहेल महमूद हे भारतात परतले असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. पाकिस्तानी दूतावासाकडून आज (शुक्रवार) पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त दिल्लीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पाकिस्तानकडून परराष्ट्र मंत्री (राज्य) एम जे अकबर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. अर्थात अद्यापी दोन्ही देशांमधील तणाव पूर्णत: निवळलेला नाही.

गेल्या काही दिवसांपासून भारत व पाकिस्तानमधील राजनैतिक वर्तुळांत अत्यंत संघर्षपूर्ण वातावरण आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक अधिकाऱ्यांना एकमेकांकडून "त्रास' दिला जात असल्याचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत. पाकिस्तानने गेल्या आठवड्यात महमूद यांना अनिश्‍चित काळासाठी पाकिस्तानला परत बोलावले होते. मात्र आता महमूद परतल्याने ही तणावपूर्ण परिस्थिती निवळण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

""नवाझ शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर पाकमध्ये आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच भारत-पाक राजनैतिक संघर्ष उद्‌भविला असण्याची शक्‍यता आहे,'' असे पाकिस्तानमधील  भारताचे माजी उच्चायुक्त टीसीए राघवन यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan's envoy back in India