पामेला अँडरसनचे पंतप्रधान मोदींना पत्र 

वृत्तसंस्था
Friday, 29 November 2019

- पामेला अँडरसनने आता थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले.

वॉशिंग्टन : हॉलिवूडची अभिनेत्री, आंतरराष्ट्रीय पातळीवर शाकाहार आणि पर्यावरणसंवर्धनाचा पुरस्कार करणाऱ्या पामेला अँडरसनने आता थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित सरकारच्या कार्यक्रमांमधून शाकाहाराचा प्रसार केला जावा, अशी मागणी केली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

पामेलाने या पत्रामध्ये वैश्‍विक तापमानवाढ आणि वाढत्या प्रदूषणाबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. जगभरातील संशोधकांनी वातावरणातील बदलांना याआधीच आणीबाणी म्हणून घोषित केले असून, त्यावर तातडीने उपाययोजना आखायला हव्यात असे तिने म्हटले आहे. दुग्धोत्पादन, मांस आणि अंडी यासाठी पशुपालन केल्याने मोठ्या प्रमाणावर हरितगृह वायूंची निर्मिती होते. या सगळ्या घटकांचा हरितगृह वायू उत्सर्जनातील वाटा एक पचमांश एवढा असल्याचे तिने म्हटले आहे.

मांस आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या यांचा प्रदूषणातील वाटा मोठा आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेही तापमानवाढीचा सामना करण्यासाठी शाकाहाराकडे वळणे गरजेचे असल्याचे म्हटले असून, हा आता पर्याय राहिला नसून गरज बनली असल्याचेही पामेलाने तिच्या पत्रात नमूद केले आहे.

दुग्धजन्य पदार्थ हद्दपार व्हावेत

सरकारचे विविध उपक्रम आणि बैठकांमधून दुग्धजन्य पदार्थ आणि मांसापासून तयार करण्यात आलेले घटक हद्दपार केले जावेत, असे तिने म्हटले आहे. दुग्धजन्य उत्पादनांना सोयाबीनपासून तयार करण्यात आलेले पदार्थ एक उत्तम पर्याय ठरू शकतात, असा विश्‍वासही तिने व्यक्त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pamela Anderson writes to PM Modi urges him to promote veganism at government events