द. कोरियाच्या ‘पॅरासाइट’ची ऑस्करवर छाप 

पीटीआय
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

दक्षिण कोरियाच्या ‘पॅरासाइट’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळवून इतिहास रचला. ऑस्करचे विजेतेपद मिळविणारा हा पहिलाच बिगरइंग्रजी चित्रपट ठरला.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळविणारा पहिलाच बिगरइंग्रजी चित्रपट 
लॉस एंजिल्स  - जगातील सर्व चित्रपट क्षेत्राचे लक्ष लागलेल्या ऑस्कर पुरस्कारांचा वितरण समारंभ रविवारी (ता. ९) रात्री मोठ्या दिमाखात पार पडला. चित्रपट समीक्षकांचे दावे फोल ठरवीत दक्षिण कोरियाच्या ‘पॅरासाइट’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळवून इतिहास रचला. ऑस्करचे विजेतेपद मिळविणारा हा पहिलाच बिगरइंग्रजी चित्रपट ठरला. सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट या चार गटांमध्ये ‘पॅरासाइट’ने बाजी मारली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘जोकर’चा नायक जोक्विन फिनिक्स हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ‘ज्युडी’तील रिनी झेलवेगरला हिची निवड झाली. यंदाच्या या ९२ व्या ‘ॲकॅडमी अवॉर्ड’कडे बोटे दाखविण्यात आली. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदा या सोहळ्यात स्वतंत्र सूत्रसंचालक नव्हता. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या नामांकनामध्ये एकाही महिला दिग्दर्शकाचे नाव नव्हते. पण, असे असले तरी हॉलिवूडचा हा झगमगता कार्यक्रम उत्कंठावर्धक ठरला. जेनेली मोना आणि आणि बिली पोर्टर यांच्या धमाकेदार सादरीकरणाने सुरुवात झालेला हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. सर्वात शेवटी सहायक अभिनेत्याचा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पीट याने स्वीकारल्यानंतर एकच जल्लोष झाला. रॅप गायक इमिनेम याच्या अत्यंत सुंदर कार्यक्रमानंतर उपस्थितांनी उभे राहून त्याचे कौतुक केले. 

९२ व्या ऑस्कर विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे - कंसात चित्रपटाचे नाव 
सर्वोत्कृष्ट चित्रपट - पॅरासाइट 
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट - पॅरासाइट 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - बाँग जून हो (पॅरासाइट) 
उत्कृष्ट पटकथा - बाँग जून हो आणि जिन वोन (पॅरासाइट) 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -रिनी झेलवेगरला (ज्युडी) 
सर्वोत्कृष्ट अभिनेता - जोक्विन फिनिक्स (जोकर) 
सहायक अभिनेता - ब्रॅड पिट (वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड) 
सहायक अभिनेत्री - लॉरा डर्न (मॅरेज स्टोरी) 
उत्कृष्ट गाणे - आय एम गोना लव्ह मी अगेन- एल्टन जॉन (रॉकेटमॅन) 
मूळ गीत - हिल्डर गुडनाडोटायर (जोकर) 
उत्कृष्ट आधारित पटकथा - टायका वैयतिटी (जोजो रॅबिट) 
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट - जोश कुली, मार्क आणि जोनास रिव्हेरा ‘टॉय स्टोरी ४’साठी 
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट - मॅथ्यू ए चेरी आणि करेन रुपर्ट टॉलिव्हर यांना ‘हेअर लव्ह’साठी 
लाइव्ह ॲक्शन लघुपट - माशर्ल चेरी यांना ‘द नेबर्स विंडो’साठी 
उत्कृष्ट निर्मिती - बार्बरा लिंग आणि नॅन्सी हेग (वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड) 
उत्कृष्ट वेशभूषा - जॅकलिन ड्युरेन (लिटिल वुमेन) 
उत्कृष्ट माहितीपट - स्ट्वेन बोग्ना, ज्युलिया रिशेर्ट आणि जेफ रिशेर्ट (अमेरिकन फॅक्टरी) 
लघू माहितीपट - डॉन सिल्व्हेस्टर (फोर्ड व्हर्सेस फेरारी) 
उत्कृष्ट ध्‍वनिमुद्रण - १९१७ 
उत्कृष्ट छायांकन - रॉजर डिकिन्स (१९१७) 
उत्कृष्ट संपादन - मायकेल मॅककुस्कर आणि अन्ड्र्यू बकलँड (फोर्ड व्हर्सेस फेरारी) 
उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट - गिलुमे रोशेरॉन, गर्ग बटलर आणि डॉमनिक ट्युशे (१९७१) 
उत्कृष्ट रंगभूषा आणि केशरचना - काझू हिरो, ॲनी मार्गन आणि व्हिव्हियन बेकर (बॉम्बशेल) 

‘जोकर’ सर्वाधिक चर्चेत 
वॉकिन फिनिक्स यांचा ‘जोकर’ हा चित्रपट २०१९मधील सर्वाधिक चर्चेत होता. या चित्रपटाला ‘ऑस्कर’साठी सर्वांत जास्त म्हणजे ११ गटांमध्ये नामांकन मिळाले होते. ‘जोकर’नंतर जास्त नामांकन मिळविणारे तीन चित्रपट होते. त्यात ‘१९७१’, ‘द आयरिशमॅन’ आणि ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड’ हे चित्रपट दहा नामांकनासह ‘ऑस्कर’च्या शर्यतीत होते. ‘पॅरासाइट’, ‘लिटिल वुमन’, ‘मॅरेज स्टोरी’ आणि ‘जोजे रॅबिट’ या चित्रपटांना प्रत्येकी सहा नामांकने मिळालेली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parasite wins Oscar for Best Picture