VIDEO : पाकिस्तानात होतेय स्वतंत्र 'सिंधूदेशा'ची मागणी; मोर्चात लावले मोदींचे पोस्टर 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

पाकिस्तानमध्ये आता एका वेगळ्या देशाची मागणी जोर धरु लागली आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये आता एका वेगळ्या देशाची मागणी जोर धरु लागली आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतामध्ये स्वतंत्र अशा देशाची मागणी जोर धरत आहे. 'सिंधू देश' या नावाने नवे राष्ट्र बनवले जावे, अशी ही मागणी आहे. ही मागणी फक्त तोंडी नाहीये. तर या मागणीसाठी आता पाकिस्तानातील लोक रस्त्यावर उतरू लागले आहे. सिंध प्रांतातील सान शहरामध्ये गेल्या रविवारी याबाबतची मोठी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील अनेक नेत्यांचे फलक झळकलेले पहायला मिळाले.

17 जानेवारी रोजी ही प्रचंड मोठी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये लोकांनी मोदींसह जगभरातील अनेक प्रमुख नेत्यांचे फोटो असलेले फलक हातात घेतले होते. यांसह त्यांनी अशी मागणी लावून धरली होती की, आंतरराष्ट्रीय समुदायाने या आमच्या स्वातंत्र्यलढ्यात मदत करावी. हस्तक्षेप नोंदवावा आणि स्वतंत्र सिंधू राष्ट्राची मागणी पूर्णत्वास न्यावी. यावेळी मोर्चात मोठ्या प्रमाणावर स्वतंत्र सिंधू राष्ट्राच्या घोषणा देण्यात येत होत्या.

जीएम सैयद यांनी बांग्लादेशच्या स्वातंत्र्यानंतर याबाबतचे आंदोलन सुरु केले होते. पाकिस्तानमध्ये वेगळ्या सिंधूदेशाची मागणी सिंध प्रांतातील राष्ट्रवादी असणारे पक्ष करत आहेत. बांग्लादेश स्वतंत्र झाल्यानंतर जीएम सैयद यांनी आंदोलनास सुरवात केली होती. त्यांनी सिंधच्या राष्ट्रवादाला दिशा दिली आणि वेगळ्या सिंधूदेशाचा विचार पहिल्यांदा प्रखर करुन जनमाणसात रुजवला. या आंदोलनातील नेत्यांचं म्हणणं आहे की, संसदीय पद्धतीने स्वातंत्र्य तसेच अपेक्षित अधिकार मिळू शकत नाहीत.

हेही वाचा - Corona Update : आतापर्यंत देशात एकूण 2.24 लाख लसीकरण; गेल्या 24 तासांत भारतात 13,788 नवे रुग्ण

वेगळ्या बलुचिस्तानची मागणी जुनी
स्वतंत्र सिंधू राष्ट्राची मागणी ही काही नवी मागणी नाहीये. याआधीही पाकिस्तानमध्ये वेगळ्या राष्ट्राच्या मागण्या झाल्या आहेत. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या अवैधरित्या ताब्यात घेतलेल्या गिलगिट बाल्टिस्तान या भागातील बलुचिस्तानमध्येही स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी जुनी आहे. यासाठी अनेक कार्यकर्ते अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. सरकारच्या कारवाईच्या भीतीपोटी हे लोक इंग्लंडसह इतर देशांमधून या मागण्या लावून धरत आहेत. त्यानंतर आता स्वतंत्र सिंधू राष्ट्राची मागणी जोर धरत आहे. 

बलुचिस्तानमध्ये सिंधच्या स्वांतत्र्याच्या समर्थक असणाऱ्या संघटनांनी गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, ते चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा एकत्रितपणे विरोध करतील. त्यांनी म्हटलं होतं की, चीनच्या दमनकारी सीपीईसी प्रोजेक्टमुळे सिंध आणि बलुचिस्तना दोन्ही प्रांत प्रभावित झाले आहेत. बलूच राजी अलोई संघटनेचे प्रवक्ता बलोच खान यांनी म्हटलं की सीपीईसीच्या माध्यमातून चीन सिंध आणि बलुचिस्तानवर ताबा आणू इच्छित आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Placards PM Narendra Modi raised pro freedom rally Sann town Sindh Pakistan