पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड; ग्रंथही जाळले

वृत्तसंस्था
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करत दोषींना अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. 

इस्लामाबाद : पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली असून, पवित्र ग्रंथही जाळण्यात आले आहेत. ही घटना सिंध प्रांतातील खैरपूर जिल्ह्यात मागील आठवड्यात घडली. काही समाजकंटकांनी ही तोडफोड केल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानातील हिंदू मंदिराची समाजकंटकांनी तोडफोड केली होती. त्यानंतर अज्ञातांनी पळ काढला. या घटनेवरून पंतप्रधान खान यांनी ट्विट करुन दोषींना अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. या सर्व बाबी कुरानच्या विरोधात असून, हिंदू समुदायातील नागरिकांनी याप्रकरणी खटला दाखल केला आहे. हे मंदिर हिंदू समुदायातील लोकांच्या घराजवळच असल्याने या मंदिराच्या देखरेखीसाठी कोणालाही ठेवण्यात आले नाही.  

दरम्यान, हिंदू मंदिराच्या सुरक्षेसाठी विशेष कार्यदल स्थापन करण्याची मागणी पाकिस्तान हिंदू परिषदेचे सल्लागार राजेश कुमार हरदसानी यांनी केली. या घटनेमुळे हिंदू समुदायातील लोकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Imran Khan orders investigation in attack on Hindu temple