पंतप्रधान मोदी आणि नवाज शरीफ यांच्यात नेपाळमध्ये गुप्त बैठक?

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 4 October 2020

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांच्या राजकीय वापसीमुळे इम्रान खान सरकारमध्ये खळबळ उडाल्याचे दिसतंय

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांच्या राजकीय वापसीमुळे इम्रान खान सरकारमध्ये खळबळ उडाल्याचे दिसतंय. इम्रान खान यांचे राजकीय सल्लागार शाहबाज गिल यांनी नवाज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि शरीफ यांच्यात गुप्त बैठक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

नवाज शरीफ यांनी नेपाळमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती, असा दावा शाहबाज यांनी केला आहे. शरीफ पाकिस्तानविरोधी नाहीत, पण ते व्यावसायिक मानसिकतेचे आहेत. कोणी पाकिस्तानी उद्योगपती पंतप्रधान मोदींची भेट घेऊ शकतो का? पण नवाज शरीफ यांनी परराष्ट्र विभागाला न सांगता नेपाळमध्ये मोदींची भेट घेतली, असं ते म्हणाले आहेत. मात्र, उभय नेत्यांमधील भेट केव्हा झाली, याबाबत शाहबाज यांनी खुलासा केलेला नाही.

सुशांत आत्महत्याः एम्सच्या अहवालानंतर भाजप आता फॉरेन्सिक टीमवरही आरोप करेल,...

नवाज शरीफ आणि त्यांच्या परिवाराचे भारतीयांसोबत व्यक्तिगत व्यापारिक संबंध आहेत. या संबंधांचा त्यांना फायदा झाला. त्यामुळे शरीफ यांनी पाकिस्तान अवामी तहरीकचे नेता अल्लामा ताहिर उल कादरी यांना न्यायालयात हजर केले नाही, असा आरोपही शाहबाज यांनी केलाय. कादरी यांना नवाज शरीफ यांच्या भारतीयांसोबतच्या संबंधाची माहिती होती, असं सांगितलं जातं. 

याआधी पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनीही नवाज शरीफ यांच्यासंबंधी वक्तव्य केलं होतं. त्यांनी नवाज यांना भारताचा एजेंट म्हटलं आहे. नवाज शरीफ पंतप्रधान मोदींसोबत फोनवर बोलतात, असा आरोप रशीद यांनी केला होता. विरोधी पक्षांनी पाकिस्तानी सेना प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यासोबत भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर रशिद यांचे वक्तव्य आले होते. नवाज शरीफ यांच्या सेना विरोधी भाषणांमुळे त्यांना भारतीय मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात कव्हरेज मिळत आहेत, असंही ते म्हणाले होते.

मुलांच्या मदतीला सोनू सूद आला धावून ; ऑनलाइन अभ्यासासाठी बसवला मोबाईल टॉवर

पंतप्रधान इम्रान खान यांनीही नवाज शरीफ यांच्यावर निशाणा साधला. शरीफ यांनी सैन्यावर टीका करुन भारताचा पक्ष घेतला आहे. नवाज शरीफ देश विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींशी भेट घेतली असेल, तर त्याची माहिती सर्वांसमोर ठेवावी, असं ते म्हणाले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi and nawaj sharif secret meeting in nepal