
नरेंद्र मोदींचे जपानी भाषेत ट्वीट म्हणाले...;''मी टोकियोमधील''
टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) क्वाड परिषदेत (Quad Summit) सहभागी होण्यासाठी दोन दिवासांच्या जपान दौऱ्यावर गेले आहेत. दोन दिवसांच्या जपान दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी टोकियो येथे जपानी बहुराष्ट्रीय कंपनी NEC कॉर्पोरेशनचे अध्यक्ष नोबुहिरो आंदो यांच्यासोबत बैठक घेतली. या भेटीत दोघांमध्ये स्मार्ट सिटी आणि भारतातील शिक्षण क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मोदींनी जपानमधील विविध व्यावसायिकांशी चर्चा केल्यानंतर जपानी भाषेत ट्वीट केले आहे. (PM Modi Japan Tour)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जपानी भाषेत केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, जपान दौऱ्यादरम्यान मी टोकियोमधील अनेक व्यावसायिकांशी संवाद साधला. यामध्ये अनेक विषयांवर जसे की, नवीन संशोधनापासून ते गुंतवणुकीपर्यंत, तंत्रज्ञानापासून वस्त्रोद्योगापर्यंतच्या सुधारणा आणि स्टार्ट-अपपर्यंतच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मला भारताबद्दलचा उत्साह आणि भारतातील तरुणांची उद्योजकीय शक्ती किती मोठी आहे याबद्दलची जाणीव झाली. (PM Modi Tweet In Japanese Language )
हेही वाचा: मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र लढणार की आघाडीसह? काँग्रेस नेत्यानं सांगितला प्लॅन
मोदींनी जपानमधील उद्योगपतींसोबत गोलमेज बैठका घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. याशिवाय 24 मे रोजी मोदींची जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदींनी जपानमधील टॉप-30 कंपन्यांचे सीईओ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी व्यवसाय अधिक सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी भारतात अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणांबाबत व्यापारी नेत्यांना अवगत केले. तसेच 'मेक इन इंडिया फॉर वर्ल्ड'साठी आमंत्रित केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.
Osamu Suzuki सोबत गुंतवणूकीसाठी चर्चा
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे सल्लागार ओसामू सुझुकी यांचीही भेट घेतली. यावेळी या दोघांमध्ये भारतातील गुंतवणूक, नावीन्य, इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन आणि पुनर्वापर केंद्रे याविषयी चर्चा करण्यात आली. ओसामू सुझुकीसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारताच्या ऑटोमोटिव्ह उद्योगात सुझुकीच्या परिवर्तनीय भूमिकेचे कौतुक केले.
हेही वाचा: ...तर अमेरिकन सैन्य चीन विरोधात उभे राहणार; बायडेन यांचे मोठे विधान
सुझुकी भारतात करणार मोठी गुंतवणूक
या वर्षी मार्चमध्ये, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने घोषित केले आहे की, ते 2026 पर्यंत गुजरातमध्ये बॅटरी इलेक्ट्रिक वाहने (BEVs) आणि बॅटरीच्या स्थानिक उत्पादनासाठी सुमारे 150 अब्ज येन (सुमारे 10,445 कोटी) गुंतवणूक करणार आहे. कंपनीची संपूर्ण मालकी असलेली कंपनी सुझुकी मोटर गुजरात प्रायव्हेट लिमिटेड (SMG) 2026 पर्यंत SMG च्या विद्यमान प्लांटच्या जमिनीवर BEV बॅटरीसाठी प्लांट उभारण्यासाठी 7,300 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. तसेच, उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी SMG 3,100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी पुढाकार
पंतप्रधान मोदी आणि युनिकलोचे सीईओ तदाशी यानाई यांच्यामध्येदेखील चर्चा झाली. या चर्चेमुळे भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना मिळण्यास मदत होणार आहे. भेटीदरम्यान मोदींनी यानाई यांना भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने पीएम-मित्र योजनेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले असून, यानाई यांनी भारतातील लोकांच्या उद्यमशीलतेचे तोंडभरून कौतुक केल्याचे बागची यांनी सांगितले.
Web Title: Pm Narendra Modi Tweet In Japaneses Language
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..