इम्रान खान पैसे वाचवण्यासाठी कोठे राहणार पाहा?

वृत्तसंस्था
सोमवार, 8 जुलै 2019

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकच्या दौऱयावेळी हॉटेलमध्ये राहणार नाहीत.

वाशिंग्टनः पाकिस्तानवर सध्या आर्थिक संकंट कोसळले असून, खर्च कमी करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सुद्धा पाऊल उचलले आहे. अमेरिकच्या दौऱयात ते हॉटेलमध्ये न राहता पाकिस्तानी राजदुताच्या निवासस्थानी राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

इम्रान खान 21 जुलैपासून तीन दिवस अमेरिकेच्या दौऱयावर जाणार आहेत. दौऱयादरम्यान महागडया, आलिशान हॉटेलऐवजी वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानी राजदुताच्या निवासस्थानी राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे, असे वृत्त पाकिस्तानमधील 'डॉन' या संकेतस्थळाने दिले आहे. अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत असद माजीद खान यांच्या निवासस्थानी राहिल्यास दौऱ्याचा खर्च कमी होऊ शकतो. प्रमुख पाहुणे अमेरिकेत पोहोचल्यानंतर सिक्रेट सर्व्हीसच्या एजंटसवर त्या व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी असते. या दौऱ्याचा वॉशिंग्टनच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी शहर प्रशासनाची असते.

पाकिस्तानवर आर्थिक संकट कोसळले असून, दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या त्यांच्या धोरणामुळे जागतिक आर्थिक संस्थांकडून मदत मिळवण्यात त्यांना अडचणी येत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी वेगवेगळया उपायोजना केल्या असून, हॉटेलऐवजी राजदुताच्या निवासस्थानी राहणे हा सुद्धा खर्च कमी करण्याचा एक मार्ग आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM wants to avoid pricey hotels during his stay in Washington