पत्र पोचण्यासाठी लागली १०० वर्षे; अमेरिकेतील मिशिगनमधील घटना

वृत्तसंस्था
Tuesday, 15 September 2020

मॅकक्विन नावाच्या चुलत बहिणीला लिहिलेल्या या पत्रात थंडीचा, आईच्या गुडघेदुखीचा व पत्र लिहिताना घरातील वातावरणाचा उल्लेख असून, आजी व आजोबांची ख्यालीखुशालीही विचारली आहे.

वॉशिंग्टन - जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत टपाल विभागामार्फत १०० वर्षांपूर्वी पाठविलेले पत्र ते दोन दिवसांपूर्वी त्यावर नमूद केलेल्या पत्त्यावर पोचल्‍याचे उघडकीस आले.

मिशिगन येथे राहणाऱ्या ब्रिटनी किच यांनी टपालपेटी उघडली असता त्यात नेहमीची बिले व एका पोस्ट कार्डासह काही पत्रे होती. यात एक पोस्ट कार्डही होते. किच म्हणाल्या की, त्यावर २९ ऑक्टोबर १९२० अशी तारीख दिसली. पोस्ट कार्डावर मी राहत असलेल्या मिशिगनमधील ब्लेडिंग शहराचाच पत्ता होता; पण हे पत्र रॉय मॅकक्विन यांच्या नावे होते. पोस्ट कार्डावरील हस्ताक्षरही पुसट झाले होते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 मॅकक्विन नावाच्या चुलत बहिणीला लिहिलेल्या या पत्रात थंडीचा, आईच्या गुडघेदुखीचा व पत्र लिहिताना घरातील वातावरणाचा उल्लेख असून, आजी व आजोबांची ख्यालीखुशालीही विचारली आहे. तसेच पत्राला उत्तर पाठविण्याचे आर्जवही केले आहे. पोस्ट कार्डावर अमेरिकेचे दिवंगत अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे चित्र असलेले एक सेंटवर टपाल तिकीट असून, त्यावर जेम्सटाउन असा शिक्का आहे. हे पत्र किच यांच्या जन्मापूर्वी पाठविलेले आहे. या पत्रावर नमूद केलेल्या मॅकक्विन किंवा बर्गेस यांच्या नातेवाइकांचा वा या कुटुंबांना ओळखत असलेल्यांचा शोध घेण्यासाठी पत्र किच यांनी फेसबुक ग्रुपवर पोस्ट केले आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जुन्या पत्राची ऑनलाइन खरेदी
टपाल विभागाच्या प्रवक्त्याने याबाबत सांगितले की, आमच्याकडे आलेली पत्रे हरविल्याचे व नंतर सापडल्याचे प्रसंग क्वचितच दिसतात. जुनी पत्रे व पोस्ट कार्डाबाबत जी अनेकदा जुन्या बाजारातून, दुर्मीळ वस्तूंच्या दुकानातील किंवा अगदी ऑनलाइनवर खरेदी केलेली असतात, त्यांचा आमच्या प्रणालीत पुन्हा नोंद होते. त्यावर पत्ता व योग्य टपाल मूल्य असेल तर असे पत्र पुढे पाठविले जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: post card delivered to Michigan home 100 years late