esakal | भारताला मदतीसाठी बायडेन यांच्यावर दबाव

बोलून बातमी शोधा

Joe Biden

भारताला मदतीसाठी बायडेन यांच्यावर दबाव

sakal_logo
By
पीटीआय

वॉशिंग्टन - ॲस्ट्राझेनेका लशीसह कोरोनाप्रतिबंधक अन्य लशी आणि अन्य जीवरक्षक वैद्यकीय साधनांचा पुरवठा भारतात करण्‍यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर दबाव वाढत आहे. येथील यूएस चेंबर ऑफ कॉमर्स या शक्तीशाली संस्थेबरोबरच वरिष्ठ व कनिष्ठ सभागृहातील सदस्य आणि प्रतिष्ठित भारतीय अमेरिकी व्यक्ती अशा विविध पातळीवरून हा दबाव टाकण्यात येत आहे.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या जगभरात वाढत आहेत. कोरोनाचा मोठा फटका बसलेल्या भारत, ब्राझील व अन्य देशांना अमेरिकेत साठा केलेल्या ॲस्ट्राझेनेका लशीचे लाखो डोस व जीवरक्षक साधनांचा पुरवठा बायडेन प्रशासनाने करावा, यासाठी ‘यूएस चेंबर ऑफ कॉमर्स प्रोत्साहन देत आहे, असे संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष व आंतरराष्ट्रीय व्यवहाराचे प्रमुख मायरॉन ब्रिलियंट म्हणाले. लशींच्या एवढ्या डोसची अमेरिकेला गरज नाही. प्रत्येक अमेरिकी नागरिकाला लस मिळेल, एवढी लस निर्मिती स्थानिक उत्पादक जूनपर्यंत करतील, असा अंदाज आहे, असेही त्यांनी सांगितले. जोपर्यंत आपण कोरोनापासून सुरक्षित राहत नाहीत, तोपर्यंत कोणीही या साथीपासून बचाव करू शकत नाही. अशावेळी जर अमेरिकी सरकारने भारतासारख्या गरजवंत देशांना लस दिली तर आपले संबंध मजबूत होतीलच शिवाय कोव्हॅक्स आणि जगभरातील अन्य भागीदारांबरोबर आपण काम करू शकू, असा विश्‍वास ब्रिलियंट यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: अमेरिकेनं 'जॉन्सन'च्या लशीवरील बंदी उठवली; धोक्याचा इशारा बंधनकारक

भारतातील कोरोनाचे भयानक संकट पाहता जोपर्यंत सर्व जग सुरक्षित होत नाही, तोपर्यंत ही साथ नष्ट होणार नाही, असे म्हणता येऊ शकते. म्हणूनच पेटंटचा विचार न करता जागतिक पातळीवर लस उत्पादनाला वेग येण्यासाठी अध्यक्ष बायडेन यांनी पाठिंबा द्यायला हवा.

- रशिदा तालिब,सदस्या, अमेरिकी काँग्रेस

परराष्ट्र मंत्र्यांनी केले होते आवाहन

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या मदतीच्या आवाहनानंतर ‘यूएस चेंबर ऑफ कॉमर्स’ने हे निवेदन केले. कोरोनाविरोधात लढण्यासाठी जयशंकर यांनी जगाची मदत मागितली होती. सध्याच्या जागतिक संकटात आमचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी हरप्रकारे प्रयत्न करीत आहेत. भारत जगाला मदत करत असल्याने जगानेही भारताला सहकार्य केले पाहिजे, अशी अपेक्षा जयशंकर यांनी ट्विटद्वारे केली होती. ‘‘आवश्‍यक गोष्टींचा पुरवठा विनाअडथळा करण्यासाठी अमेरिका भारताबरोबर यापुढेही काम करेल, अशी ग्वाही अमेरिकेच्या उपप्रवक्त्या जेलिना पोर्टर यांनी दिली. भारतातील कोरोनासाथीच्या गंभीर परिस्थतीची अमेरिकेला कल्पना आहे, असेही त्या म्हणाल्या.