esakal | कोरोना लढाईत अप्रतिम काम केल्याबद्दल मोदींनी माझं कौतुक केलं- डोनाल्ड ट्रम्प
sakal

बोलून बातमी शोधा

donald trump and modi.jpg

डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. ते सध्या पश्चिम भागातील महत्वाच्या राज्यांमध्ये प्रचार करत आहेत.

कोरोना लढाईत अप्रतिम काम केल्याबद्दल मोदींनी माझं कौतुक केलं- डोनाल्ड ट्रम्प

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- कोरोना महामारीप्रकरणी अमेरिकेत केलेल्या उपाययोजनांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझं कौतुक केलं आहे, असा दावा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प नवाडा येथील एका प्रचार सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

सध्याच्या घडीला आपण अनेक देशांपेक्षा अधिक कोविड-१९ चाचण्या केल्या आहेत. भारताच्या आपण फार पुढे आहोत. आपण आतापर्यंत ४.४ कोटी चाचण्या घेतल्या आहेत. त्यानंतर भारताचा क्रमांक असून तेथे १.५ कोटी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फोन केला होता. मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या घेऊन तुम्ही अप्रतिम काम केलं असल्याचं ते मला म्हणाले आहेत, असं ट्रम्प म्हणाले.

शिंजो अबे यांचा उत्तराधिकारी ठरला, जाणून घ्या कोण होणार जपानचे पंतप्रधान

डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. ते सध्या पश्चिम भागातील महत्वाच्या राज्यांमध्ये प्रचार करत आहेत. नवाडामध्ये ते जास्त वेळ घालवत आहेत. ट्रम्प यांनी सभेत बोलताना मोदींचे नाव पुढे करत वृत्त माध्यमांवर टीका केली आहे. कोरोना महामारीला हाताळण्यात ट्रम्प यांना अपयश आल्याने अमेरिकी माध्यमे त्यांच्या हात धुवून मागे लागली आहेत. 

ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांच्यावरही निशाणा साधला. बायडेन यांच्या हाती अध्यक्षपदाची सूत्रे असती तर चीनच्या या विषाणूमुळे आणखी हजारो अमेरिकी नागरिकांचा मृत्यू झाला असता. जो बायजेन उपराष्ट्रपती असताना त्यांची कामगिरी अगदी सुमार दर्जाची होती. महामंदीनंतरच्या त्यांच्या कार्यकाळात सर्वात वाईट, अशक्त आणि हळूवार आर्थिक वाढ झाली होती, अशी टीका ट्रम्प यांनी केली. 

टिकटॉकच्या खरेदीसाठी भिडू मिळाला; कारभार नव्या कंपनीच्या हाती

अमेरिकेत पुन्हा नोकऱ्या याव्या यासाठी मी गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करत आहे. सीमा सुरक्षित केल्या आहेत, लष्कराची पुनर्बांधणी करण्यात आली आहे आणि आपण चीनविरोधात पूर्वीपेक्षा अधिक खंभीरपणे उभे राहिलो आहोत. मात्र, डेमोक्रॅटिक पक्षाच्या काळात विकास थांबला होता. त्यामुळे जो बायडेन अध्यक्षपदासाठी योग्य नाहीत, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.  

बायडेन यांचा विजय झाला, तर ते कट्टर डाव्यांच्या हातातील बाहुले बनतील. ते आपला देश हिंसक डाव्यांच्या हाती देतील. बायडेन यांचा विजय, चीनचा विजय असेल. बायडेन जिंकले, तर दंगलखोर जिंकतील, अराजकतावादी जिंकतील. बायडेन अमेरिकी इतिहासातील सर्वात वाईट उमेदवार आहेत, अशी टीका ट्रम्प यांनी केली. दरम्यान, ३ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे सुरु केले आहे. 

(edited by- kartik pujari)