अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना वारंवार अपमानाचा सामना करावा लागत आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला अमेरिकन सरकारने साधी दखलही न घेतल्याने इम्रान खान यांना मेट्रोने प्रवास करावा लागला होता. त्यानंतर रविवारी रात्री एका कार्यक्रमादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानच्या समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे इम्रान खान यांची अडचण झाली.
वॉशिंग्टन : अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या स्वागताला एकही अमेरिकेचा नेता आला नसल्याची घटना ताजी असतानाच आता रविवारी रात्री झालेल्या एका कार्यक्रमात स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करण्यात आल्याने त्यांची पुन्हा एकदा फजिती झाल्याचे पाहायला मिळाले.
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना वारंवार अपमानाचा सामना करावा लागत आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला अमेरिकन सरकारने साधी दखलही न घेतल्याने इम्रान खान यांना मेट्रोने प्रवास करावा लागला होता. त्यानंतर रविवारी रात्री एका कार्यक्रमादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानच्या समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे इम्रान खान यांची अडचण झाली.
इम्रान खान यांचे भाषण ऐकण्यासाठी अमेरिकेत राहणारे पाकिस्तानी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचवेळी एका बलुचिस्तानी तरुणाने उभे राहून जोराजोरात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतरांकडूनही जोरदार घोषणाबाजी झाली. अखेरीस घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. मात्र हा प्रकार सुरू असताना इम्रान खान यांनी आपले भाषण थांबवले नाही. अमेरिकेत राहणारे बलुचिस्तानी नागरिक पाकिस्तानकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानकडून सातत्याने मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा आरोप बलुचिस्तानी नागरिकांकडून सातत्याने होत असतो.
पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या इम्रान खान यांच्या स्वागताला प्रशासनातील एकही मोठा नेता आला नव्हता. त्यामुळे सध्या ट्विटरवर खान यांची खिल्ली उडवली जात आहे. इम्रान खान कतार एअरवेजच्या विमानाने सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे अमेरिकेत पोहोचले होते.