आंदोलकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यालाही सोडलं नाही- डोनाल्ड ट्रम्प

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 19 September 2020

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्णभेदावरून उसळलेल्या आंदोलनावर मोठं वक्तव्य केलं आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्णभेदावरून उसळलेल्या आंदोलनावर मोठं वक्तव्य केलं आहे. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्याबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले की, हिंसक झालेल्या आंदोलकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यालासुद्धा सोडलं नाही. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर आंदोलन करणारे समाजकंटक आणि लुटारुंची टोळी होती असं ट्रम्प यांनी म्हटलं. 

रेल्वे 21 सप्टेंबरपासून सोडणार क्लोन ट्रेन्स; प्रवाशांना मिळणार दिलासा

मिनियापोलिस इथं 25 मे रोजी डेरेक चाऊविन या पोलिसाकडून जॉर्ज फ्लॉइडला अमानुषपणे मारहाण झाली होती. तेव्हा पोलिसाने जॉर्ज फ्लॉइडच्या गळ्यावर गुडघा ठेवून तब्बल आठ मिनिटे दाबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेतील वर्णद्वेषाचा मुद्दा पुन्हा समोर आला होता. यानंतर सुरु झालेल्या आंदोलनात मोठी जाळपोळ, तोडफोड झाली होती. 
मिनीसोटा इथल्या प्रचारसभेत बोलताना ट्रम्प म्हणाले की, आंदोलकांनी अब्राहम लिंकन यांच्या पुतळ्याला टार्गेट केलं. जेव्हा त्यांनी पुतळ्यांना टार्गेट करायला सुरुवात केली तेव्हा मी त्यांना लिंकन यांच्याबद्दल सांगितलं आणि हे करू नका असंही सांगितलं पण त्यांनंतर आंदोलकांनी जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन आणि इतरांना टार्गेट करायला सुरुवात केली. इतकंच काय त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यालासुद्धा सोडलं नाही, असंही ट्रम्प यांनी सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प 2016 मध्ये मिनीसोटा इथून लढले होते. तेव्हा त्यांना 44 हजार मतांनी पराभूत व्हावं लागलं होतं. 

महात्मा गांधी अहिंसावादी होते. त्यांना फक्त शांती हवी होती. असे असताना त्यांचा पुतळा पाडण्यात आला. ते काय करत आहेत, याची त्यांना काहीही कल्पना नसावी. मला मान्य आहे की ती काही लोकांची टोळी होती. ती लुटारुंची टोळी होती, असं ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प पुढे म्हणाले की, त्यांनी एका आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ज्यात अशा समाजकंटकांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणी पुतळे पाडण्याचा विचार करणार नाही. दरम्यान, भारतीय दुतावासाने नॅशनल पार्क पोलिस आणि अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने महात्मा गांधींचा पुतळा पुन्हा स्थापित करण्यात आला आहे. 

अमेरिकेनेसुद्धा TikTok सह चायनिज अ‍ॅपवर घातली बंदी; चीनने दिली प्रतिक्रिया

अमेरिकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. ट्रम्प यांनी विरोधक जो बायडेन यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शिवाय 'ब्लॅक लाईव मॅटर' प्रकरणी आंदोलन करणाऱ्यांना त्यांनी कट्टर डावे असल्याचा ठपका ठेवला असून त्यांना अराजकवाद्यांची उपमा दिली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protesters did not leave the statue of Mahatma Gandhi said Donald Trump