Article 370 : पुलवामासारखा आणखी एक हल्ला घडेल : इम्रान खान

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

"काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम हटवल्यामुळे आणखी एक पुलवामा घडेल,' अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी केली.

इस्लामाबाद : "काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम हटवल्यामुळे आणखी एक पुलवामा घडेल,' अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी केली. 

जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानमधील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानी संसदेचे संयुक्त अधिवेशन आज झाले. त्यात इम्रान खान यांनी हे विधान केले. पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा काही संबंध नव्हता, असा दावासुद्धा इम्रान यांनी या वेळी केला. "मोदी सरकारचा हा निर्णय काश्‍मीरच्या जनतेचा आवाज चिरडू शकणार नाही. भारतीय जनता पक्ष हा त्यांच्या संस्थापकांच्या वर्णद्वेषाच्या विचारसरणीवर आधारित कार्य करणारा पक्ष आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून मुसलमान हे दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत,'' असा दावा करीत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही (आरएसएस) लक्ष केले. 

"370 वे कलम रद्द करण्याच्या मोदी सरकारचा निर्णय मोहम्मद अली जीना यांच्या द्विराष्ट्र सिद्धांताला पुष्टी देणाराच आहे. भारत हा केवळ हिंदूचाच असावा, अशी "आरएसएस'ची इच्छा आहे आणि कोणत्याही मुस्लिमाला दुय्यम नागरिकाची वागणूक देणार, हे जीना यांना आधीच माहीत होते,'' असेही इम्रान खान म्हणाले. हिंदूंना पहिले प्राधान्य देण्याच्या जातीयवादी विचारातून भारताची निर्मिती झाली आहे, तर पाकिस्तानात सर्व नागरिकांना समानतेची वागणूक दिली जाते, असा दावा त्यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulwama like attacks can happen says Imran Khan