भारताच्या दबावाने 'जैश'च्या मुसक्‍या आवळल्या; मुख्यालयावर पाक सरकारचा ताबा 

वृत्तसंस्था
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

"राष्ट्रीय सुरक्षा समितीची पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार जैशे महंमदच्या मुख्यालयाचा ताबा घेण्यात आला आहे,'' असे अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 
बहावलपूर येथील "जैश'च्या मुख्यालयात असलेल्या मदरशात 70 शिक्षक आणि 600 विद्यार्थी आहेत. पंजाब पोलिसांची सुरक्षा संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आल्याचेही अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने म्हटले आहे. 

लाहोर : आंतरराष्ट्रीय दाबावापुढे झुकून पाकिस्तानने जैशे महंमद या दहशतवादी संघटनेच्या प्रशासकीय मुख्यालयाचा ताबा घेतला. जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला या संघटनेनेच घडवून आणला होता. या हल्ल्यात सीआरपीएचे 40 जवान हुतात्मा झाले होते. 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमध्ये पुलवामातील हल्ल्याचा एकमुखी निषेध करण्यात आला. पाकिस्तानचा अत्यंत जवळचा सहकारी असलेल्या चीननेही या ठरावाच्या बाजूने मतदान केले. या आंतरराष्ट्रीय दणक्‍यानंतर पाकिस्तानने तातडीने हालचाल करून "जैश'च्या मुख्यालयाचा ताबा घेतला. पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी याबाबत म्हणाले, ""पंजाब प्रांताच्या सरकारने बहावलपूरमधील जैशे महंमदच्या कार्यालयाचा ताबा घेतला आहे. या कार्यालयाच्या परिसरातील मदरसा आणि जामा मशिदीचाही ताबा घेतला आहे; तसेच तेथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.'' लाहोरपासून 400 किलोमीटर अंतरावर बहावलपूर आहे. 

"राष्ट्रीय सुरक्षा समितीची पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार जैशे महंमदच्या मुख्यालयाचा ताबा घेण्यात आला आहे,'' असे अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 
बहावलपूर येथील "जैश'च्या मुख्यालयात असलेल्या मदरशात 70 शिक्षक आणि 600 विद्यार्थी आहेत. पंजाब पोलिसांची सुरक्षा संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आल्याचेही अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने म्हटले आहे. 

पाकिस्तानने कालच मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदच्या जमात उद दावा आणि त्यासाठी निधी गोळा करणाऱ्या फलाह ए इन्सानियत फाउंडेशनवर बंदी घातली होती. लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचा "चेहरा' म्हणून जमात उद दावा ही संघटना काम करते. 

पाकिस्तान "ग्रे लिस्ट"मध्येच 
"फायनान्शिअल ऍक्‍शन टास्क फोर्स'ने पाकिस्तानला ऑक्‍टोबरअखेरपर्यंत ग्रे लिस्टमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पॅरिसमध्ये झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दहशतवाद्यांना अर्थसाह्य थआंबविण्याबाबत पाकिस्तानने अत्यंत कमी पावले उचलल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे टास्क फोर्सने म्हटले आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदतीच्या मुद्‌द्‌यावर जून 2018मध्ये पाकिस्तानला "ग्रे लिस्ट'मध्ये टाकण्यात आले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulwama terror attack Pakistan govt takes control of Jaish-e-Mohammad headquarters in Pakistan