कोरोनारुग्णांसाठी १४ दिवसांचे विलगीकरण; WHOची शिफारस | Quarantine | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

institutional quarantine
कोरोनारुग्णांसाठी १४ दिवसांचे विलगीकरण; ‘डब्लूएचओ’ची शिफारस

कोरोनारुग्णांसाठी १४ दिवसांचे विलगीकरण; WHOची शिफारस

जीनिव्हा : कोरोनाची लक्षणे दिल्यानंतर रुग्ण सात-दिवसांत अनेकजण बरे होत असले तरी १४ दिवसांच्या विलगीकरणाची शिफारस जागतिक आरोग्य संघटना (WHO) अजूनही करीत आहे, असे संघटनेने वतीने मंगळवारी (ता.४) पत्रकार परिषदेत सांगितले. (International Corona Updates)

‘डब्लूएचओ’चे कोरोनाविषयक आपत्कालीन व्यवस्थापन (Emergency Management) मदत पथकाचे अब्दी महमूद म्हणाले, ‘‘प्रत्येक देशाने त्यांचा स्थानिक परिस्थिती पाहून विलगीकरणाच्या कालावधीचा निर्णय घ्यावा. ज्या देशांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी आहे, तेथे विलगीकरणाचा काळ जास्त असेल तर रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. त्याचवेळी जेथे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असेल तेथे देशातील व्यवहार सुरू ठेवण्यासाठी विलगीकरण कमी मुदतीचे असणे योग्य ठरेल.’’

हेही वाचा: दोन डोसनंतरही Omicron चा धोका; शास्त्रज्ञांना आढळली 2 नवीन लक्षणं

कोरोना व इन्ल्फ्युएंझाच्या एकाच वेळी लागण होणे शक्य असल्याचे सांगत हे दोन स्वतंत्र विषाणू शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे हल्ला करतात. त्यामुळे त्यांच्या संयोगातून नवा विषाणू तयार होण्याची शक्यता कमी आहे, असे महमूद म्हणाले.

‘डब्लूएचओ’ने दिलेल्या माहितीनुसार २९ डिसेंबर २०२१ रोजी जगातील १२८ देशांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याचे दिसले आहे. कोरोनाचा हा नवा प्रकार सर्वांत प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळल्यानंतर तेथे रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली, पण त्यानंतर लगेचच त्यात लक्षणीय घट झाली. ओमिक्रॉनबाधितांना रुग्णालयात दाखल करणे व अशा बाधितांच्‍या मृत्यूचे प्रमाणही कमी होते. पण दक्षिण आफ्रिकेसारखीच परिस्थिती अन्य देशात असू शकत नाही, असे महमूद यांनी सांगितले.

ओमिक्रॉनचा हल्ला श्वसन प्रणालीवर

सध्या सुरू असलेल्या संशोधनातील ताज्या माहितीनुसार ओमिक्रॉनचा हल्ला फुप्फुसांपेक्षा शरीराच्या वरील भागातील श्वसन प्रणाली होतो. ही आपल्यासाठी चांगली बातमी आहे. पण उच्च-जोखीम असलेल्या आणि लसीकरण न झालेल्या व्यक्तींना नव्या विषाणूंमुळे गंभीर आजार होऊ शकतात.

१९ जानेवारीला आढावा बैठक

डब्लूएचओ’च्या तज्ज्ञांचा धोरणात्मक सल्लागार गट (एसएजीई) १९ जानेवारीला लसीकरणाबाबत आढावा बैठक घेणार आहे. बूस्टर डोसचा कालमर्यादा, भिन्न लशींचे एकत्रीकरण आणि भविष्यातील लशींची निर्मिती या विषयांवर त्यावेळी चर्चा होणार आहे.

हेही वाचा: सिंधुदुर्गात आठवीपर्यंतच्या शाळा बंद

ओमिक्रॉननंतर आणखी नवा प्रकार

ओमिक्रॉनने सध्या जगाला वेठीस धरले असून काही आठवड्यांतच याचा नव्या प्रकारही उद्‍भवू शकतो, अशी भीती महमूद यांनी यावेळी व्यक्त केली. जेथे संवेदनाक्षम विशेषतः लस न घेतलेल्या व्यक्तींची संख्या जास्त आहे, तेथे नव्या विषाणूचा शिरकाव होऊ शकतो, असे ते म्हणाले. डेन्मार्कमध्ये कोरोनाच्‍या अल्फा प्रकाराचा संसर्ग झालेल्यांची संख्या दोन आठवड्यातच दुप्पट झाली तर ओमिक्रॉनच्याबाबत तो काळ फक्त दोन दिवसांचा आहे, याकडे महमूद यांनी लक्ष वेधले.

ओमिक्रॉनचा फैलाव जगभरात झालेला असताना सर्दी व खोकल्याला सामान्य आजार समजण्याची चूक करू नका. डेल्टापेक्षा ओमिक्रॉन कमी घातक असला तरी त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. आपण अत्यंत धोकादायक टप्प्यावर आहोत. आता सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्‍यक आहे.

- कॅथरिन स्मॉलवूड, डब्लूएचओच्या वरिष्ठ आप्तकालीन अधिकारी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :global news
loading image
go to top