राफेल म्हणजे 'गेम चेंजर'; हवाई दलाचे शिक्कामोर्तब 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जुलै 2019

लढाऊ राफेल विमानांच्या खरेदीवरून गेली दोन वर्षे भारतीय राजकारणामध्ये चिखलफेक सुरू असली, तरीही ही विमाने भारतीय हवाई दलाच्या मारक क्षमतेमध्ये कमालीची भेदकता आणतील. हा विश्‍वास अन्य कुणी नव्हे, तर खुद्द हवाई दलाच्या उपप्रमुखांनी व्यक्त केला आहे. 

पॅरिस : लढाऊ राफेल विमानांच्या खरेदीवरून गेली दोन वर्षे भारतीय राजकारणामध्ये चिखलफेक सुरू असली, तरीही ही विमाने भारतीय हवाई दलाच्या मारक क्षमतेमध्ये कमालीची भेदकता आणतील. हा विश्‍वास अन्य कुणी नव्हे, तर खुद्द हवाई दलाच्या उपप्रमुखांनी व्यक्त केला आहे. 

हवाई दलाचे उपप्रमुख राकेशकुमारसिंह भदौरिया यांनी फ्रान्समध्ये राफेल विमानातून भरारी घेतली. या उड्डाणाविषयी भदौरिया यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. ते म्हणाले, "युद्धजन्य परिस्थितीमध्ये राफेलमुळे भारताच्या मारक क्षमतेमध्ये कमालीची भेदकता येणार आहे. ही विमाने ताफ्यात दाखल झाल्यानंतर हवाई दल अधिक सक्षम होईल. हवाई दलामध्ये 'सुखोई-30' आणि राफेल या दोन्ही विमानांची भेदकता शत्रूला धडकी भरविण्यासाठी उपयुक्त ठरतील.'' 

'चाचणीसाठी राफेलमधून केलेल्या उड्डाणामधून आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सुखोई-30 या लढाऊ विमानासोबत व्यूहरचनेसाठी राफेल विमानांचा वापर कसा करायचा, हेही यातून उमगले आहे. राफेल विमाने भारतासाठी 'गेम चेंजर' ठरतील. येत्या काही वर्षांमध्ये आम्ही ज्या प्रकारचे युद्ध किंवा आक्रमक मोहिमा आखत आहोत, त्यासाठी राफेल अत्यंत उपयुक्त आहे', असा सूचक इशाराही भदौरिया यांनी दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rafale will be Game Changer for Indian Air Force says Air Marshal RKS Bhadauria