esakal | भारतातील असहिष्णुता, संताप शिगेला - राहुल
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul-Gandhi

भारतातील असहिष्णुता, संताप शिगेला - राहुल

sakal_logo
By
पीटीआय

दुबई - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज परदेशातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मागील साडेचार वर्षांमध्ये देशातील असहिष्णुता आणि संताप शिगेला पोचला असून, सत्तेत असलेल्या लोकांच्या मानसिकतेतून याचा जन्म झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या राहुल हे संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर असून, येथे ते विविध घटकांशी संवाद साधत आहेत.

राहुल यांनी आज आयएमटी दुबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘भारतामध्ये कल्पना यायला हव्यात, आतापर्यंत अशा संकल्पनांनीच देशाला आकार दिला असून, भारतानेही त्यामध्ये भर घातलेली दिसते, लोकांचे ऐकणे हीसुद्धा भारताने मांडलेली संकल्पना आहे. सहिष्णुता ही आमच्या संस्कृतीमध्येच आहे; पण दुर्दैवाने मागील साडेचार वर्षांमध्ये देशाचे चित्र बदललेले दिसते. या काळामध्ये मोठ्या प्रमाणात असहिष्णुता, संताप वाढला, तसेच दोन समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर विभाजन होताना पाहायला मिळाले. हे सगळे सत्ताधारी लोकांमुळे होत आहे.’’

शेतीत क्रांतीची गरज
भारतामध्ये खेळांना प्रथम प्राधान्य देता येणार नाही, कारण भूकबळीसारखी असंख्य आव्हाने आमच्यासमोर आहेत. कृषी क्षेत्रामध्ये आम्हाला क्रांतिकारक बदल घडवून आणावे लागतील, कारण आमची विद्यमान कृषी व्यवस्था ही अद्याप जागतिक अर्थकारणाशी जोडली गेलेली नाही. बॅंकिंग यंत्रणेमध्येही बदल घडवून आणावे लागतील, त्यामुळे लघू आणि मध्यम उद्योजकांना अर्थपुरवठा होईल, असेही त्यांनी सांगितले.

loading image