राजा रविवर्मांच्या 'तिलोत्तमे'चा ५.१७ कोटींस लिलाव

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

रविवर्मा यांची चित्रे अत्यंत जिवंत वाटतात आणि त्यात भारतीयत्व स्पष्टपणे दिसते, अशी प्रशंसा सॉथबे या लिलाव करणाऱ्या कंपनीने केली आहे. राष्ट्रीय खजिना म्हणून भारत सरकारने जाहीर केलेल्या रविवर्मा यांनी रामायण, महाभारत आणि इतर पौराणिक कथांमधील व्यक्तिमत्त्वे रंगविली आहेत

न्यूयॉर्क - प्रख्यात चित्रकार राजा रविवर्मा यांनी काढलेले तिलोत्तमा या पौराणिक कथेतील अप्सरेचे चित्र येथील लिलावात 5.17 कोटी रुपयांना विकले गेले आहे.

येथे मॉडर्न अँड कॉंटेम्पररी साउथ एशियन आर्ट या प्रदर्शनात हा लिलाव करण्यात आला. या चित्राला 3.90 कोटी रुपये अपेक्षित असताना त्याहून अधिक किंमत मिळाली. राजा रविवर्मा यांची फार निवडक चित्रे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाली असून, त्यातील तिलोत्तमेचे हे चित्र आहे.

रविवर्मा यांची चित्रे अत्यंत जिवंत वाटतात आणि त्यात भारतीयत्व स्पष्टपणे दिसते, अशी प्रशंसा सॉथबे या लिलाव करणाऱ्या कंपनीने केली आहे. राष्ट्रीय खजिना म्हणून भारत सरकारने जाहीर केलेल्या रविवर्मा यांनी रामायण, महाभारत आणि इतर पौराणिक कथांमधील व्यक्तिमत्त्वे रंगविली आहेत. पौराणिक कथेनुसार, सुंद आणि उपसुंद या दोन दैत्यबंधूंना मारण्यासाठी ब्रह्मदेवाच्या विनंतीनुसार तिलोत्तमा ही अप्सरा स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. तिला मिळविण्याच्या इर्ष्येने दोन्ही भावांनी एकमेकांशी लढाई केली आणि त्यात त्यांचा अंत झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raja Ravi Varma's Tilottama painting fetches over ₹5 crore