प्लाझ्मा थेरेपीला अमेरिकेत मान्यता; आपत्कालीन परिस्थितीत होणार वापर 

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 24 August 2020

जगभरात सर्वत्र प्लाझ्मा उपचार पद्धतीचा स्वीकार झालेला नाही. मात्र, अमेरिकेतील कोरोनाचा संसर्ग अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नसल्याने सरकारकडून वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत. 

वॉशिंग्टन- आपत्कालीन परिस्थितीत कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर करण्यास अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने परवानगी दिली आहे. या उपचार पद्धतीचे फायदे संभाव्य धोक्यांपेक्षा अधिक असल्याचे या विभागाने म्हटले आहे. आतापर्यंत देशातील ७० हजार कोरोनाग्रस्तांवर या उपचार पद्धतीचा वापर आधीच झाला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 

जगभरात सर्वत्र प्लाझ्मा उपचार पद्धतीचा स्वीकार झालेला नाही. मात्र, अमेरिकेतील कोरोनाचा संसर्ग अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नसल्याने सरकारकडून वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत. 

अनलॉक 4 मध्ये काय सुरू होणार? केंद्र सरकार लवकरच घेणार निर्णय
 

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने आज एक निवेदन प्रसिद्ध करत आपल्या निर्णयाची माहिती दिली. ‘रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्तांवर आपत्कालीन परिस्थितीत प्लाझ्मा थेरेपीचा वापर करता येणार आहे. याचा कदाचित कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या प्रयत्नांमध्ये उपयोग होईल. या उपचार पद्धतीमुळे होणारे फायदे हे संभाव्य तोट्यांपेक्षा अधिक असल्याचे लक्षात आले आहे,’ असे या निवेदनात म्हटले आहे. 

अमेरिकेचे आरोग्य मंत्री अलेक्स अझर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. कोरोनाविरोधातील लढाईतील अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांना या निर्णयामुळे मोठे बळ मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, प्लाझ्मा थेरेपीचा प्रचंड फायदा झाल्याचे आणि इतर उपचार पद्धतींच्या तुलनेत ३५ टक्के यश अधिक असल्याचा दावाही अझर यांनी केला आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. लसीचा विकास आणि उपचार यामध्ये अन्न व औषध प्रशासन अनेक अडथळे आणत आहे, अशी टीका कालच ट्रम्प यांनी केली होती. चिनी विषाणूविरोधातील लढाईत या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे उपचारांची व्याप्ती वाढली आहे, असं डोनाल्ड ट्रम्प ट्विट करुन म्हणाले.

कोविड-१९ लशीला मोनोक्लोनल अँटिबॉडी ठरु शकतात पूरक!

ही अद्यापही प्रायोगिक पद्धत 

कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींच्या रक्तातील प्लाझ्माचा वापर करुन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याची प्लाझ्मा थेरेपी अद्यापही प्रायोगिक अवस्थेत असून या उपचार पद्धतीचे प्राथमिक निष्कर्षावरून ठोस काहीही सांगता येत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने प्लाझ्मा थेरेपीला मान्यता दिल्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याबाबतील माहिती देताना जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, गेल्या शतकात या उपचार पद्धतीचा विविध रोगांवरील उपचारांत वापर झाला होता आणि त्याचे यश कमीअधिक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्माचे प्रमाण वेगवेगळे असल्याने या पद्धतीचे प्रमाणीकरण करणे अवघड आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recognition of plasma therapy in the United States