इतर शेजाऱ्यांशी संबंध बिघडत असताना एकाने दिली भारताला साथ

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 10 August 2020

बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए के अब्दुल मोमीन यांनी भारत आणि बांगलादेशमधील संबंधाबाबत भाष्य केलं आहे

ढाका- बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए के अब्दुल मोमीन यांनी भारत आणि बांगलादेशमधील संबंधाबाबत भाष्य केलं आहे. उभय देशांमधील संबंध ऐतिहासिक आणि खडकासारखे मजबूत असल्याचं ते म्हणाले आहेत. जगातील कोणतीही शक्ती भारत आणि बांगलादेशमध्ये असणाऱ्या संबंधांना नुकसान पोहोचू शकत नाही, असं ते म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.

बांगलादेशचे भारत आणि चीनसोबत असलेले संबंध वेगवेगळ्या पातळीवरचे आहेत. याची तुलना केली जाऊ शकत नाही, असंही मोमीन म्हणाले आहेत. 1971 साली मुक्ती संग्राममधील शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतीय सीमेला लागून असलेल्या पश्चिम मेहरपुर येथील एका स्मारकाचा दौरा करण्यासाठी मोमीन आले होते. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केलं आहे. 

ब्राझीलची अमेरिकेच्या दिशेने वाटचाल; कोविड-19 मृतांचा आकडा धडकी भरवणारा

आपण सारखा दृष्टीकोण ठेवून बांगलादेशचे चीन आणि भारतासोबत असलेल्या संबंधांची तुलना केली नाही पाहिजे. भारतासोबतचे आमचे संबंध ऐतिहासिक आणि खडकासारखे मजबूत आहेत. भारतासोबत आमचे रक्ताचे नाते आहेत, तर चीनसोबत आमचे संबंध मुख्य करुन आर्थिक स्वरुपाचे आहेत. आमचा विजय भारताचा विजय आहे. आमचा विकास भारताचा विकास आहे.  त्यामुळे भारत आणि बांगलादेश संबंधांना कोणीही नुकसान पोहोचवू शकत नाही, असं मोमीन म्हणाले आहेत. 'एनडीटीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.  

अब्दुल मोमीन यांना भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या सीमावादावरुन दोन्ही देशांचे बांगलादेशसोबत असलेल्या संबंधाबाबत विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना त्यांनी भारत आणि बांगलादेशमधील संबंध 'शानदार' असल्याचं म्हटलं आहे. दोन्ही देश पुढील वर्षी बांगलादेशचा 50 वा स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यासाठी तयार आहेत. भारत आणि बांगलादेशमध्ये पाणी वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा पुढे सुरु ठेवली जाईल. तसेच भूमि आणि समुद्री सीमेबाबत द्विपक्षीय चर्चेने तोडगा काढला जाईल. उभय देशांमध्ये काही वादाचे विषय आहेत, पण आम्ही ते लवकच सोडवू, असं ते म्हणाले आहेत. 

शंभर दिवसांत एकही स्थानिक कोरोना रुग्ण सापडला नाही; जगाच्या पाठीवरचा एकमेव देश

मोमीन यांनी भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाबाबत भाष्य करणे टाळले. हा त्या दोन्ही देशांचा विषय आहे. आमचं त्याच्याशी काही देणंघेणं नाही. बांगलादेशचे लक्ष दोन्ही देशांची संबंध  चांगले ठेवत आपला विकास साधण्याकडे आहे, असं ते म्हणाले आहेत. 

दरम्यान, भारताचे शेजारी राष्ट्रांशी संबंध तणावाचे बनले आहेत. चीन, पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंकेसोबत भारताचे संबंध बिघडत चालले आहेत. असे असताना आपला शेजारी राष्ट्र बांगलादेशने भारताशी संबंध चांगले ठेवणार असल्याचं म्हटलं आहे.  तसेच उभय देशांचे संबंध रक्ताच्या नात्याने जोडले गेले असल्याचं म्हटलं आहे.

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: relationship with india historic and strong said bangladesh