सॅटेलाइट फोटोंमधून कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर, चीनमध्ये काय घडलं?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

हार्वर्डमधील वैज्ञानिकांनी सॅटेलाईट इमेजेस आणि  इंटरनेटवर सर्च यांचा अभ्यास करून कोरोना व्हायरस नेमका पसरला कसा? याची निर्मिती कशी झाली? हा व्हायरस खरंच वटवाघुळांपासून मानवी शरीरात आला का? या बाबत अजूनही माहिती मिळू शकली नाहीये.

मुंबई: जगभरात कोरोनानं अक्षरश: हाहाकार माजवला आहे. जगातले कित्येक मोठे देश या कोरोना व्हायरससमोर हतबल झालेले बघायला मिळत आहेत. चीनमधून आलेल्या या व्हायरसनं बघता बघता संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनाचे तब्बल २ लाखांच्यावर रुग्ण आहेत. मात्र हा व्हायरस नेमका पसरला कसा? याची निर्मिती कशी झाली? हा व्हायरस खरंच वटवाघुळांपासून मानवी शरीरात आला का? याबाबत अजूनही माहिती मिळू शकली नाहीये. मात्र हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या काही वैज्ञानिकांनी एक संशोधन केलंय. यानंतर एक खळबळजनक दावा हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या वैज्ञानिकांनी केलाय. 

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार चीनमध्ये ऑगस्ट २०१९ पासूनच कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली होती. हार्वर्डमधील वैज्ञानिकांनी सॅटेलाईट इमेजेस आणि  इंटरनेटवर सर्च करण्यात आलेल्या काही गोष्टींवरून हा निष्कर्ष काढला आहे. यात ऑगस्ट २०१९ मध्ये वुहान शहरातल्या काही बड्या रुग्णलयांच्या कार पार्किंगच्या सॅटेलाईट इमेजेसचा अभ्यास करण्यात आला आहे. 

हेही वाचा: धक्कादायक! मुंबई महापालिका उपायुक्तांचं कोरोनानं निधन...

रुग्णालयांच्या पार्किंगमध्ये नव्हती जागा: 

या अभ्यासानुसार, २०१९ च्या ऑगस्ट महिन्यात वुहान शहरातल्या काही रुग्णालयांमध्ये कार पार्किंगला जागा शिल्लक नव्हती. रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी होती. अशा प्रकारची गर्दी चीनच्या कुठल्याच रुग्णालयांमध्ये त्याआधी कधीही बघायला मिळाली नव्हती. चीननं रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद करण्यास डिसेंबर २०१९ मध्ये सुरुवात केली असा दावा हार्वर्डच्या वैज्ञानिकांनी केला आहे. 

इंटरनेटवर 'फ्लू'बाबत सर्च वाढले: 

या अभ्यासानुसार, २०१९ ऑगस्टच्या काळात वुहान शहरात आणि चीनमध्ये फ्लू, डायरिया, कफ अशा प्रकारच्या गोष्टींबाबत लोकं अधिक प्रमाणात इंटरनेटवरून माहिती घेत होते. कोरोनाच्या संकटाची चीनमधल्या लोकांना आधीच जाणीव होती म्हणून अशा प्रकारची माहिती लोकं घेत होते असाही दावा हार्वर्डच्या वैज्ञानिकांनी केला आहे. 

डिसेंबर महिन्यात चीनच्या दक्षिण भागात कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली अशी माहिती आहे. मात्र चीनमध्ये या व्हायरसचा प्रादुर्भाव ऑगस्टपासूनच होता असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. 

हेही वाचा: 80 वर्षीय कोरोना रुग्ण शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता; रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरूच

'हे तर हास्यास्पद': 

"हे हास्यास्पद आहे, अगदी हास्यास्पद आहे, अशा वरवरच्या निरक्षणांवरून काहीही सिद्ध होत नाही", अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं या संशोधनावर दिली आहे. त्यामुळे आता हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनातील गोष्टी खरंच सत्य आहेत का ?  आणि असतील तर चीन जगापासून अजून किती गोष्टी लपवतो आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे.    

research by harvard medical school says corona had come to china in august 2019


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: research by harvard medical school says corona had come to china in august 2019